मराठी

महाविद्यालयीन प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेस मुदत 31 पर्यंत

शिक्षण मंचचा पाठपुरावा

अमरावती दि १७ – संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ शिक्षण मंचद्वारे अमरावती विद्यापीठ प्रशासनास महाविद्यालयातील प्रवेश मुदतवाढीसाठी सातत्याने निवेदने सादर करण्यात आली होती. अखेर विद्यापीठाने सकारात्मक निर्णय घेत सुधारणा निर्देश जाहीर केले. यानुसार आता महाविद्यालयातील पदवी वर्गांसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहेत.
नीट, जेईई आणि इतर सामाईक प्रवेश परीक्षांच्या उशिरा झालेल्या परीक्षा आणि निकालांमुळे विद्यार्थ्यी संभ्रमावस्थेत आहेत. त्यामुळे कुठल्याही महाविद्यालयांचे प्रवेश अद्याप पूर्ण झालेले नव्हते. अनेक महाविद्यालयांपुढे हा यक्षप्रश्न असल्याच्या सूचना अनेक प्राचार्यांनी शिक्षण मंच संघटनेकडे केल्या होत्या. या प्रकरणी संघटनेने पुढाकार घेऊन प्रवेश मुदत वाढविण्यासाठी प्रयत्न करावे, अशी भावना व्यक्त केली होती. महाविद्यालय, पालक आणि विद्यार्थी या सर्वांसाठीच ही समस्या कठीण होऊन बसल्याची जाणीव होऊन यामध्ये विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याची भूमिका शिक्षण मंचद्वारा मांडण्यात आली होती.
यावर शिक्षण मंचचे अध्यक्ष प्रा. प्रदीप खेडकर यांच्या नेतृत्वात विद्यापीठाने घोषित केलेली मुदत वाढविण्याबद्दल कुलगुरूना विनंती करण्यात आली होती. मुदत संपल्यानंतर कुलगुरूंच्या परवानगीने प्रवेश घेण्याची पद्धत सर्व महाविद्यालये, आणि विद्यार्थ्यांसाठी किचकट ठरणार होती. त्यामुळे ही मुदत सरसकटपणे वाढवावी, अशी विनंती करण्यात आली होती. मंचाची ही मागणी कुलगुरूंनी मान्य केली.

Back to top button