मराठी

कारखाना पाहण्यास आलेल्यांवर जीवघेणा हल्ला

महाराष्ट्रात गुंडाराज

उस्मानाबाद/दि. १३ – महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे की गुंडाराज, असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. आजारी साखर कारखाना विकत घेण्यासाठी लिलावात सहभाग घेतल्यामुळे जय हिंद साखर कारखान्याचे संचालक शालिवाहन माने-देशमुख यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. बब्रुवान माने देशमुख यांनी यासदंर्भात बेंबळी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
मी व माझे भाऊ शालिवाहन माने-देशमुख पंजाब नॅशनल बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया यांच्या आग्रहास्तव उस्मानाबादच्या नितळी येथील जय लक्ष्मी शुगर हा कारखाना पाहण्यासाठी गेलो होतो. हा कारखाना हा दोन्ही बँकांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने लिलावात काढला आहे. रितसर निविदा भरून आम्ही हा साखर कारखाना पाहण्यासाठी गेलो होतो; पण या ठिकाणी विजय दंडनाईक यांचा मुलगा रोहित दंडनाईक याने अचानक येऊन आमच्या गाडीला स्वतःची गाडी आडवी लावली. त्याने व त्याच्या साथीदारांनी आमच्या गाडीच्या काचा फोडल्या आणि आमच्यावर प्राणघातक हल्ला केला, असे माने-देशमुख यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
हल्ला झाला त्या वेळी आम्ही बेसावध होतो. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे आम्हाला काहीच समजले नाही; मात्र लिलाव झाल्यास जय लक्ष्मी शुगर कारखाना आपल्या हातातून जाईन, या भीतीपोटी रोहितने त्याच्या मित्रांसमवेत हा हल्ला केल्याचे माने यांनी म्हटले आहे. सुदैवाने अतिसंक्रमित क्षेत्रात बंदोबस्तासाठी पोलिस होते म्हणून आमचा जीव वाचला, असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, या घटनेची फिर्याद बेंबळी पोलिस ठाण्यात देऊनही तिथल्या पोलिसांनी जाणून-बुजून या आरोपींना अभय देण्याचे काम केले. जामीनपात्र गुन्हे दाखल केल्याचा आरोप माने-देशमुख यांनी केला आहे. पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही तसेच या संदर्भात आम्ही आता वरील कार्यालयास तक्रार दाखल केली असून त्यासंदर्भात कार्यवाही सुरू आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

Back to top button