स्टडी इन इंडिया, स्टे इन इंडिया हा प्रकल्प राबविण्याचा निर्णय
पालक म्हणाले वैद्यकीय क्षेत्रातील विद्याथ्यांचाही विचार व्हावा
नागपूर/दि.१३– दरवर्षी लाखो विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी भारतातून परदेशामध्ये जातात. मात्र या वर्षी कोरोनाच्या प्रकोपामुळे अनेक विद्यार्थी देशात परतले आहेत. नव्याने प्रवेश घेऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये धास्ती आहे. पालकही चिंतित आहे. त्यामुळे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना भारतातच थांबून शिक्षण घेण्यासाठी ‘स्टडी इन इंडिया, स्टे इन इंडियाद्घ हा प्रकल्प राबविण्याच्या मानसिकतेत आहे. यात वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांचाही विचार व्हावा, अशी मागणी पालकांकडून होत आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भारतामधून दरवर्षी ७.५ लाख विद्यार्थी विदेशामध्ये शिक्षणासाठी जातात. यात अमेरिका, चीन, रशिया, इंग्लंड, कॅनडा या देशांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. यंदा कोरोनामुळे अडचण निर्माण झाली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आपल्याच देशात शिक्षणाची सुविधा उपलब्ध करण्याच्या योजनेवर या मंत्रालयाने काम सुरू केले आहे. यासाठी गेल्या आठवड्यात केंद्रीय शिक्षण मंत्रालयाची उच्चस्तरीय बैठकही झाली. असे झाल्यास विद्यार्थीसंख्येअभावी बंद पडू पहाणाख्रया अभियांत्रिकी महाविद्यालयांना विद्यार्थी मिळतील, मात्र त्यांना उच्च दर्जाचे शिक्षण या संस्थांमधून देणे या प्रक्रियेत महत्त्वाचे राहणार आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने घेतलेल्या या निर्णयाचा विचार करून आरोग्य मंत्रालयानेही यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी पालक आणि विद्यार्थ्यांनी केली आहे. नागपुरातील रवींद्र सरनाईक म्हणाले, त्यांची मुलगी चीनमध्ये द्वितीय वर्षाला वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी शिकत आहे. असे अनेक विद्यार्थी नागपूरसह विदर्भातून तिकडे शिकत असल्याने या काळात पालकांना काळजी वाटत आहे. विदर्भातील अनेक विद्यार्थी विदेशात शिक्षण घेत आहेत. भारतामधील खासगी महाविद्यालयांमधील अवाढव्य शुल्क, प्रवेशासाठी असलेली जीवघेणी स्पर्धा यामुळे अनेक विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणाला जाण्यापासून अडचण होते. तरीही उराशी स्वप्न बाळगून अनेक विद्यार्थी विदेशात वैद्यकीय शिक्षणासठी जातात. अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर भारतामध्ये सेवा द्यायची असल्यास त्यांना मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाची परीक्षा पास होणे बंधनकारक असते. त्याशिवाय तेथील पदवीला अर्थ उरत नाही. त्यामुळे सरकारने या कोरोनाच्या काळात वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांचाही विचार करावा, अशी मागणी पालकांकडून होत आहे.