मराठी

मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळालेल्या ३४ कोटी रुपयांच्या नुकसान भरपाई मदत वाटपात दिरंगाई 

अधिकाऱ्यांवर निलंबनाची कार्यवाही करण्याची मागणी 

मोर्शी/दि. ४ – आमदार देवेंद्र भुयार यांनी मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना गारपीट व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची ३४ कोटी ३५ लक्ष २४ हजार २०० रुपयांची मदत उपलब्ध करून शेतकऱ्यांना आधार दिला.  यामध्ये मोर्शी  तालुक्यातील ३७९६० शेतकऱ्यांचे ४०५४० हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्यामुळे मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना ३४ कोटी ३५ लक्ष २४ हजार २०० रुपये मदत प्राप्त झाली.  मात्र मोर्शी तालुक्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे आजही मोर्शी तालुक्यातील शेकडो शेतकरी या नुकसान भरपाई मदतीपासून वंचित आहे.नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार निवेदन देऊनही अधिकाऱ्यांनी मात्र याकडे डोळेझाक केली.
 तसेच मोर्शी तालुक्यात ४ सप्टेंबर २०१९ रोजी अतिवृष्टीने पडझड झालेल्या घर पुनर्बांधण व दुरुस्ती करीता ४६ लक्ष ४९ हजार ६६० रुपये निधी प्राप्त झाला होता मात्र प्राप्त झालेला ४६ लक्ष ४९ हजार ६६० रुपये निधी ३१ मार्च २०२० रोजी अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे व्यपगत होऊन शासनाकडे परत गेला. शेतकरी आधीच संकटात सापडला असून आता पुन्हा अधिकाऱ्यांच्या या जुलमी संकटांमुळे हैराण झाला आहे, कोरोना काळामध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता खेड्यापाड्यातील शेतकरी तहसील कार्यालयाचे उंबरठे झीजवत असतांना तहसीलदार मात्र त्यांना उडवा उडविचे उत्तर देऊन आल्या पावली परत करत आहे त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये तहसीलदार यांच्याप्रती प्रचंड रोष निर्माण झाला असून तालुक्यातील हजारो शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहे.
महाविकास आघाडीचे सरकार शेतकऱ्याचे असून शेतकरी हिताचे निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देणारं असून आमदार देवेंद्र भुयार यांनी मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना सप्टेंबर, डिसेंबर २०१९ व जानेवारी २०२० मध्ये अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची ३४ कोटी ३५ लक्ष २४ हजार २०० रुपये मदत ९ महिन्यामध्ये मिळवून दिले मात्र मोर्शी तालुक्यातील निष्क्रिय अधिकारी व कर्मचारी यांच्या वेळकाढू धोरणामुळे मोर्शी तालुक्यातील शेकडो शेतकरी मदतीपासून वंचित आहे. तसेच ४ सप्टेंबर २०१९ रोजी अतिवृष्टीने पडझड झालेल्या घरांना पुनर्बांधणी व दुरुस्ती करिता आलेला ४६ लक्ष ४९ हजार ६६० रुपये मदत निधी ३१ मार्च २०२० रोजी अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे परत गेला. अश्या निष्क्रिय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर  कार्यवाही करून या मदतीपासून वंचित राहिलेल्या लाभार्थ्यांना परत गेलेला निधी उपलब्ध करून देण्याची मागणी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली आहे — रुपेश वाळके उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोर्शी तालुका.

Related Articles

Back to top button