दिल्लीचे प्रदूषण धोकादायक पातळीवर
नवी दिल्ली दि ६ – देशाची राजधानी धुरामुळे झाकोळली आहे आणि ब-याच भागात दृश्यमानता कमी झाली आहे. दिल्ली-एनसीआरमधील प्रदूषणामुळे हवेची गुणवत्ता सातत्याने खालावत आहे. प्रदूषणामुळे लोकांना डोळ्यांना त्रास होऊ लागला आहे आणि श्वास घेण्यास त्रास होत आहे. येथे प्रदूषण धोकादायक पातळीवर पोहोचले आहे.
राजधानी दिल्लीतील एअर क्वालिटी इंडेक्स (एक्यूआय) 450 पार केले आहे. दिल्ली प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार, दिल्लीच्या आयटीओमध्ये एक्यूआय 488 नोंदविण्यात आले होते, जे अत्यंत धोकादायक आहे. त्याच वेळी, नोएडामध्ये ते 396 ते 420 पर्यंत आहे आणि गुरुग्राममध्ये ते 330 ते 400 पर्यंत गेले आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिका-यांचे म्हणणे आहे, की येत्या काही दिवसांत राजधानी दिल्लीतील हवेची गुणवत्ता आणखी खराब होण्याची शक्यता आहे. पंजाब आणि हरयाणामध्ये पिकांची बुडे जाळल्यामुळे दिल्लीतील वायू प्रदूषण चिंताजनक पातळीवर पोहोचले आहे. सीपीसीबीच्या म्हणण्यानुसार दिल्लीतील आनंदविहार येथे आज पहाटे चार वाजता एक्यूआयचे प्रमाण 419, आरके पूरम येथे 400, द्वारका येथे 410, बवाना येथे 430 आणि आयटीओमध्ये 488 होते.
सीपीसीबीने म्हटले आहे, की दिल्ली हवेतील पीएम 2.5 आणि पीएम 10 चे प्रमाण खूप वाढले आहे. अशीच परिस्थिती फरिदाबाद, गाझियाबाद, नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गुरुग्राममध्ये आहे. दिल्लीतील पीएम 2.5 पातळी 486 वर पोहोचली आहे. दिल्लीचे गॅस चेंबरमध्ये रूपांतर झाले आहे. बीएलके सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या श्वसन विभागाचे डॉ संजीव नायर म्हणाले, की दिल्ली सध्या गॅस चेंबरमध्ये बदलली आहे. यामुळे रुग्णांमध्ये श्वास आणि खोकला यासारख्या तक्रारी वाढत आहेत. दिल्लीत वाढत्या प्रदूषणामुळे लोकांना घशात वेदना, घश्यात सूज, डोळे पाण्याने आणि श्वासोच्छवासाची समस्या उद्भवते. अशा वेळी घरात राहणे हाच एक उपाय आहे.
-
दिल्लीत फटाके फोडण्यास बंदी
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कोरोना विषाणू आणि वाढते वायू प्रदूषण पाहता दिल्लीत फटाक्यांवर बंदी घातली आहे. फटाके खरेदी आणि विक्रीवर ही बंदी असेल. म्हणजेच 7 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत दिल्लीत कोणतेही फटाके विकले जाणार नाहीत किंवा ते वाजविण्यासही परवानगी देण्यात येणार नाही. यापूर्वी कोलकत्ता उच्च न्यायालयानेही पश्चिम बंगालमध्ये फटाके फोडण्यास बंदी घातली आहे, या वर्षी फटाके फोडण्यास व विक्रीवर बंदी असेल. वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी दिल्लीचे अरविंद केजरीवाल यांनीही दिल्लीत फटाके विक्रीवर बंदी आणण्याची घोषणा केली.