मराठी

नाराजी असली, तरी सरकार मजबूत

छगन भुजबळ यांचा निर्वाळा; काँग्रेसच्या आमदारांच्या नाराजीवर भाष्य

नाशिक/दि. २४ – राज्यात तीन पक्षाचे सरकार आहे. त्यामुळे कोणीतरी नाराज होणारच; पण सरकार मजबूत आहे, असा निर्वाळा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे.

नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भुजबळ यांनी काँग्रेसमधील नाराज आमदारांच्या मुद्द्यावर हा निर्वाळा दिला. तीन पक्षाचे सरकार असल्यावर कोणीतरी नाराज होणार हे स्वाभाविक आहे; मात्र सरकारला त्याचा काहीच धोका नाही. सरकार मजबूत आहे. निधी वाटपावरून नाराज असलेल्या काँग्रेसच्या 11 आमदारांसोबत चर्चा करून त्यांची नाराजी दूर करण्यात येईल, असे भुजबळ म्हणाले.

नाशिक जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी स्थिती नियंत्रणात आहे. जिल्ह्यात सर्वच ठिकाणी बेड आणि ऑक्सिजनची व्यवस्था पुरेशी आहे. प्रत्येक गल्लीबोळात जाऊन कोरोनाची टेस्ट करण्यात आली. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे, असे सांगतानाच रुग्ण वाढत असले, तरी देशात नाशिकचा रिकव्हरी रेट चांगला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. या वेळी त्यांनी गुजरातला जाणारे पाणी अडवण्याची गरज असल्याचे सांगितले. गुजरातला वाहून जाणारे पाणी नाशिकला वळवणे आवश्यक आहे. आताच हे पाणी अडवले नाही तर पुढे कधीही हे पाणी अडवणे शक्य होणार नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.

सुशांतसिंह प्रकरण सीबीआयकडे हे बरेच झाले!

या वेळी त्यांनी अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण सीबीआयकडे देण्यात आल्याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली. राजपूत प्रकरण सीबीआयकडे गेले हे बरे झाले, नाहीतर मुंबई पोलिस चांगले काम करीत नाहीत. कुणाला तरी वाचवत आहेत, असा आरोप झाला असता. आता हा तपास सीबीआयकडे गेल्याने सत्य बाहेर येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Related Articles

Back to top button