बंदी मोडून भाविक तुळजापुरात

तुळजापूर/दि.१५ – शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर साडेतीन शक्तीपीठापैकी एक असलेल्या तुळजापूर शहरात प्रवेश बंदी करण्यात आली आहे; पण या प्रवेशबंदीचे पहिल्याच दिवशी तीनतेरा वाजल्याचे पाहायला मिळाले. आज मंदिर परिसरात भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. यामध्ये मुखपट्टी न घातलेले भाविकही मोठ्या संख्येने होते. त्याचबरोबर सामाजिक अंतर भानाचे पालनही कुठे दिसून आले नाही. त्यामुळे तुळजाभवानीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी आणि तुळजापूरच्या नागरिकांनी प्रशासनाने घालून दिलेले सर्व नियम पायदळी तुडवले.
नवरात्र महोत्सवानिमित्त तुळजाभवानी मंदिरातून ज्योत घेऊन जाण्यासाठी राज्यभरातून भाविक तुळजापूरमध्ये येतात. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तुळजाभवानी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आणि जिल्ह्याधका-यांनी यंदाचा नवरात्रोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला. तुळजापूर शहरात प्रवेशबंदी करण्यात आली; पण या प्रवेशबंदीच्या अनुषंगाने कुठल्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे प्रवेशबंदीच्या पहिल्याच दिवशी तुळजाभवानी मंदिर परिसरात भाविकांची गर्दी पाहायला मिळाली. नवरात्रोत्सव काळात तुळजापूर शहरात दुचाकी, चारचाकी वाहनांसह पायी चालत येणाऱ्यांनाही प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
तुळजापूर शहरामध्ये महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा या भागातून मोठ्या प्रमाणात भाविक तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी येत असतात. कोरोना संकटामुळे तुळजापूर प्रवेशबंदी असल्याने याची माहिती शेजारील राज्यांना देण्यात आली होती; पण शेजारी राज्यांतील भाविकही देवीच्या दर्शनासाठी येत आहेत. त्यामुळे मंदिर ट्रस्ट आणि प्रशासनासमोर भाविकांची समजूत काढण्याचं मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
राज्यात कोरोनाचा जोर कमी दिसत असला, तरी धोका टळलेला नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी आणि मंदिर ट्रस्टच्या सदस्यांमध्ये झालेल्या बैठकीत यंदाचा नवरात्रोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत. नवरात्रात देवीच्या नित्य पूजा, कुलाचार, धार्मिक विधी हे दरवर्षी नियमाप्रमाणे होणार आहेत; मात्र गरबा, दांडिया आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम होणार नाहीत. सार्वजनिक मेळावे आणि समारंभ यांच्यावर निर्बंध असणार आहेत.
मार्गदर्शक सूचना
उत्सवादरम्यान धार्मिक विधी काळात पुजारी, मानकरी आणि मंदिर अधिकारी अशा 50 पेक्षा जास्त व्यक्तींना उपस्थित राहण्यास परवानगी नाही. पुजारी, मानकरी आणि कुलाचार करणारे नागरिक यांची रॅपिड अँटीजन टेस्ट बंधनकारक असणार आहे. व्यापारी आणि इतर कर्मचाऱ्यांची नियमित तपासणी करण्यात येणार आहे