मुंबई/दि.२५-बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बिहारमधील कोरोना संपला का असा प्रश्न विचारला आहे. तसंच या निवडणुकीत सुशांत सिंह राजपूतचा मुद्दा असावा यासाठी प्रयत्न केल्याची टीकाही राऊत यांनी केली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले.
बिहार विधानसभेच्या 243 जागांसाठी बिहारमध्ये तीन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. पहिला टप्प्यात 28 ऑक्टोबरला, दुसऱ्या टप्प्यात 3 नोव्हेंबर तर तिसऱ्या टप्प्यात सात नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर 10 नोव्हेंबर रोजी या मतदानाचा निकाल घोषित होणार आहे. बिहार विधानसभेचा कार्यकाळ 29 नोव्हेंबरला संपतो आहे. त्यामुळं नवीन सरकार हा कार्यकाळ संपण्याआधी स्थापन होणं गरजेचं आहे.
निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर संजय राऊत म्हणाले की, देशाच्या राजधानीत कोरोनाच्या भीतीमुळे आम्ही संसदेचं अधिवेशन घेऊ शकत नाही आणि बिहारसारख्या राज्यात निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. बिहारमध्ये कोरोना संपला का? हे पाहावं लागेल. सरकारला, तिथल्या राज्यकर्त्यांना आणि निवडणूक आयोगाला वाटलं असेल की कोरोना संपला आणि आम्ही निवडणुका घेतोय तर त्यासंदर्भात तसं जाहीर व्हायला पाहिजे. हा सरकारने घेतलेला निर्णय आहे. निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे असं सांगितलं जाईल आणि निवडणुका रेटल्या जातील.
देशातील परिस्थिती अभूतपूर्व आहे. लोकांना मदतीची गरज आहे. लोकांना बोटावर फक्त शाई लावून घ्यायची नाही. ऑनलाईन प्रचार, ऑनलाईन निवडणूक, ऑनलाईन मतदान यामधून निवडणुकीची सिक्रसी टिकेल का याचा विचार सर्वच राजकीय पक्षांनी करणं गरजेचं आहे. निवडणूक घ्यायला ही योग्य परिस्थिती आहे का हाच प्रश्न आहे.
बिहारमधील मतदान हे पूर्णपणे जात आणि धर्मावर होतं. तिथे अनेकदा गरिबी हा सुद्धा मुद्दा नसतो. त्यांच्या सरकारविषयी सुप्त राग आहे, असंही संजय राऊत म्हणाले.