मराठी

योगी, नितीशकुमारांमध्ये विसंवादी सूर

घुसखोरांना हाकलण्याची योगींची भाषा

पाटणा/दि.५  – बिहारमधील मतदानाच्या शेवटच्या टप्प्यापूर्वी नागरिकता दुरुस्ती कायद्याबाबत मुख्यमंत्री नितीशकुमार आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यात विसंवादी सूर दिसून आला. कटिहारमध्ये भाजपचे फायरब्रँड नेते योगी आदित्यनाथ म्हणाले, की बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार बनल्यानंतर घुसखोरांना देशाबाहेर काढून दिले जाईल. त्याच वेळी, किशनगंजमध्ये बिहारचे नितीशकुमार यांनी नामोल्लेख टाळून योगी यांच्यावर जोरदार हल्ला टढविला.
राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी आणि नागरिकता दुरुस्ती कायद्याच्या नावाखाली कुणालाही वगळले जाण्याची शक्यता नाही. नितीशकुमार यांनी योगी यांच्या भाषणाची संभावना मूर्ख या शब्दांत केली. तिस-या टप्प्यातील मतदानाच्या अगदी आधी या दोन मुद्यावरून दोन्ही नेत्यांमध्ये मोठा गोंधळ उडाला. योगी आदित्यनाथ बिहार विधानसभेच्या तिसर्या आणि शेवटच्या टप्प्यातील प्रचारासाठी कटिहार येथे पोहोचले. जाहीर सभांना संबोधित करताना ते बिहारमधील घुसखोरीच्या समस्येबद्दल म्हणाले, की कटिहार घुसखोरीच्या प्रश्नाने ग्रासले आहेत. जेव्हा बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार स्थापन होईल, तेव्हा ते घुसखोरांना काढून टाकतील. एखादा घुसखोर भारतीय सीमेतून आत येण्याचा प्रयत्न करीत असेल, तर त्याला भारताच्या सीमेबाहेर काढून टाकू.
त्याचवेळी मुख्यमंत्री नितीशकुमार म्हणाले, की जे घुसखोरीबाबत बोलतात, त्याचे बोलणे मूर्खपणाचे आहे. देशातून कोणाला बाहेर काढाल? या देशात अशी कोणतीही शक्ती नाही, की ती त्यांना वगळू शकेल. आपण समाजात प्रेम, बंधुता आणि सद्भावना यांचे वातावरण निर्माण केले आहे. आम्ही सर्वांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला आहे. काही लोकांना समाजात लढा चालू ठेवण्याची इच्छा असते. आमचे उद्दीष्ट आहे, की जेव्हा सर्व लोक प्रेम आणि बंधुतेच्या अनुषंगाने जगतात, तेव्हा समाज पुढे जाईल. लोक प्रगती करतील.
योगी यांच्या वक्तव्याला शह देण्याचा प्रयत्न नितीशकुमार यांनी केला. योगी यांनी आपल्या सभांमध्ये नितीशकुमार यांच्या कार्याबद्दल काही सांगितलेले नाही. योगी म्हणाले, की बांगला देश आणि पाकिस्तानमधील घुसखोरांना बाहेर फेकून देण्यात येईल. बिहार निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या दोन्ही दिग्गज नेत्यांच्या या दोन वेगवेगळ्या विधानांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

Related Articles

Back to top button