ओबीसी विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्तीचा निधी वितरीत
पालकमंत्र्यांनी मिळवून दिला विद्यार्थ्यांना न्याय
अमरावती/दि. ४ – परदेशी शिक्षणासाठी ओबीसी विद्यार्थ्यांना मिळणा-या शिष्यवृत्तीची प्रकरणे निधीअभावी प्रलंबित राहू नयेत म्हणून राज्याच्या महिला व बालविकास मंत्री एड. यशोमती ठाकूर यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. विद्यार्थ्यांसाठीचा तीन कोटी रूपयांचा निधी राज्य शासनाकडून ओबीसी बहुजन कल्याण विभागाकडे सुपुर्द करण्यात आला आहे.
ओबीसी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे परदेशातील नामांकित विद्यापीठांतील उच्च शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये म्हणून राज्य शासनाकडून अशा विद्यार्थ्यांना परदेश शिष्यवृत्ती देण्यात येते. मात्र, त्यासाठी अर्ज केलेल्या काही विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती त्यांना प्राप्त झालेली नव्हती. निधीअभावी हे प्रकरण प्रलंबित होते. त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी ही बाब पालकमंत्र्यांना भेटून सांगितली. पालकमंत्र्यांनी त्याची तत्काळ दखल घेतली व गत नियोजन बैठकीत ही बाब तत्काळ उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निदर्शनास आणून दिली व याबाबत पाठपुरावा केला.
त्यामुळे शासनाकडून परदेश शिष्यवृत्ती योजनेचा तीन कोटी निधी ओबीसी बहुजन कल्याण विभागाच्या पुणे येथील संचालक कार्यालयाला वितरीत केला आहे.
समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशातील उच्च शिक्षणाच्या संधी प्राप्त करता याव्यात, यासाठी ही योजना चालवली जाते. विद्यार्थ्याला लागणारे शिक्षण शुल्क व इतर आवश्यक बाबींसाठी ही शिष्यवृत्ती दिली जाते. योजनेचे तीन कोटी निधी प्राप्त झाल्याने लवकरच विद्यार्थ्यांना त्यांच्या शिष्यवृत्तीची रक्कम प्राप्त होणार आहे. अमरावती जिल्ह्यातील तीन विद्यार्थ्यांनाही शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे, अशी माहिती विभागाच्या प्र. संचालक विजया पवार यांनी दिली.