अमरावती/दि. 28 – कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याची पार्श्वभूमी लक्षात घेऊन सार्वजनिक हितासाठी घेतलेल्या सर्व नियमांची कडक अंमलबजावणी झाली पाहिजे. नियमांची पायमल्ली करणा-या बेशिस्तांची गय करू नये, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज दिले.
कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांच्या अनुषंगाने जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधीक्षक, पोलीस निरीक्षक व इतर विभागाच्या अधिका-यांची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा पोलीस अधिक्षक हरी बालाजी यांच्यासह विविध अधिकारी यावेळी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. नवाल म्हणाले की, कोविड साथीच्या प्रतिबंधासाठी लागू नियमांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी महसूल, पोलीस, आरोग्य व इतर विभागांनी समन्वय ठेवून मोहिम राबवावी. फौजदारी प्रक्रिया संहिता व इतर अधिनियमानुसार आतापर्यंत केलेल्या प्रतिबंधात्मक कारवायांची प्रलंबित प्रकरणे तत्काळ निकाली काढावीत. आवश्यक तिथे समन्स बजावणे, वॉरंट काढणे, बाँड लिहून घेणे, दुकाने सील करणे यासारख्या कारवायांत नियमितता ठेवावी. साथ नियंत्रण व सार्वजनिक हितासाठी लागू नियमांची कुणीही बेशिस्त वर्तणूक करून पायमल्ली करत असेल तर तत्काळ कारवाई करावी. फौजदारी कारवाईबरोबरच दंडही ठोठवावा.
-
ग्रामस्तरीय समित्या एक्टिव्ह करा
ग्रामीण भागात कोरोना नियंत्रणासाठी ग्रामस्तरीय कोविड संनियंत्रण समित्या स्थापण्यात आल्या आहेत. त्यांची कामे प्रभावीपणे व्हावीत. तालुकास्तरीय समितीने याबाबत वेळोवेळी आढावा घ्यावा. बाधित आढळल्यास कंटेनमेंट आणि मिनी कंटेनमेंट झोनची अंमलबजावणी काटेकोरपणे व्हावी, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.
-
नाकेबंदी काटेकोर करा
साथीच्या पार्श्वभूमीवर सीमाभाग सील करण्यात आला आहे. तिथे नाकेबंदी, देखरेख, तपासणी नियमितपणे व्हावी. संचारबंदीत सकाळी सात ते अकरा या वेळेत जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी मुभा देण्यात आली आहे. या वेळेतही दुकानांत अनावश्यक वर्दळ, गर्दी होऊ नये. तिथे सोशल डिस्टन्स व इतर दक्षता नियमांचे पालन झालेच पाहिजे.
-
लसीकरण केंद्रांवरही शिस्त ठेवा
लसीकरण केंद्रांवर गर्दी होता कामा नये, यासाठी टोकन सिस्टीम राबविण्याचे आदेश यापूर्वीच दिले आहेत. त्याचे पालन व्हावे. आता 18 ते 44 या वयोगटातील सर्वांना कोविड प्रतिबंधात्मक लस मोफत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुषंगाने लसीकरण कार्यक्रमाबाबत पूर्वतयारी व नियोजन करावे, असेही निर्देश त्यांनी दिले. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याचा आढावा जिल्हाधिका-यांनी यावेळी घेतला.