मराठी

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेची फलश्रृती..

परिमंडळात हजारपेक्षा जास्त घरे  प्रकाशमान

अमरावती, दि. ०७ डिसेंबर २०२१:  महावितरणच्या वतीने राबविण्यात आलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेत अमरावती परिमंडळातील अनुसुचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील १ हजार २२  घरगुती ग्राहकांना  नवीन वीज जोडणी दिल्याने त्यांची घरे प्रकाशमान झाली आहेत.   डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती जगभरात दि.१४ एप्रिल २०२१ रोजी साजरी करण्यात आली. या जयंती निमित्त राज्यातील अनुसुचित जाती, जमाती प्रवर्गातील व्यक्तींचे जीवन प्रकाशमान करण्‍याच्या दृष्टीने ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या पुढाकाराने दि.१४ एप्रिल २०२१ ते दि.६ डिसेंबर २०२१ अर्थात बाबासाहेबांची जयंती ते पुण्यतिथी या कालावधीत “डॉ.बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना “राबविण्यात आली. या योजनेत लाभार्थी अर्जदारांना वीज जोडणीसाठी ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज करण्याची सोय उपलब्ध करण्यात आली होती. तसेच लाभार्थ्यांना या योजनेतून घरगुती वीज जोडणी घेण्यासाठी महावितरणकडे केवळ ५०० रूपये अनामत रक्कम आणि ती देखील पाच समान मासिक  हप्त्यामध्ये वीजबिलातून भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.
याशिवाय योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी अर्जदाराकडे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जातीचे प्रमाणपत्र, वीज जोडणीकरीता करण्यात येणाऱ्या विहित नमुन्यानुसार अर्जाकरीता आवश्यक कागदपत्रे जसे की, आधार कार्ड, रहिवासी दाखला आदी असणे आवश्यक होते.अर्जदारांनी वीजजोडणीसाठी अर्ज केल्याच्या ठिकाणी यापूर्वीची थकबाकी नसणे. तसेच शासनमान्य विद्युत कंत्राटदारांकडून वीज संच मांडणीचा चाचणी अहवाल अर्जासोबत जोडणे आवश्यक होते. तसेच या योजनेविषयीची अधिक माहीती या महावितरणच्या संकेतस्थळावरही उपलब्ध करून देण्यात आली होती.अमरावती परिमंडळाअंतर्गत देण्यात आलेल्या अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती प्रवर्गातील वीज जोडणी देण्यात आलेल्या एकूण १ हजार २२ लाभार्थ्यामध्ये अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातील अनूक्रमे ३७२ व ६५० लाभार्थ्यांचा समावेश आहे. यापैकी ६०८ लाभार्थी हे अनुसुचित जातीचे असून ४१४ लाभार्थी हे अनुसुचित जमाती प्रवर्गातील आहे. याव्यतीरिक्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेत लाभ मिळण्यासाठी अर्ज केलेल्या आणि पात्र असलेल्या २३६ लाभार्थ्यांचे काम प्रगतीपथावर आहे.

Related Articles

Back to top button