वरुड/दि.२८ – गेल्या १० वर्षांपासुन बांधलेल्या नालीतील पाणी वाहून जात नसल्याने आणि पाणी तुंबत असल्याची तक्रार शहरातील विवेकानंद कॉलनी परिसरातील नागरिकांनी नगरपरिषदेकडे दिली परंतु १० वर्षांपासुन नगरपरिषदेकडून दखलच घेतल्या जात नसल्यामुळे आता न्याय मागावा तरी कोणाकडे? असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे.
प्राप्त माहीतीनुसार, शहरातील सुशिक्षित कॉलनी म्हणुन विवेकानंद कॉलनी परिसराकडे पाहिले जाते. या ठिकाणी प्राध्यापक, कंत्राटदार, शिक्षक व विविध क्षेत्रातील महत्वपुर्ण नागरिकांचा निवास आहे. अशा स्थितीत येथील सुशिक्षित नागरिक गेल्या १० वर्षांपासुन नालीसाठी नगरपरिषदेकडे भांडत आहेत, अनेक तक्रारी दिल्या परंतु केवळ नालीतील पाणी निघत नाही, अशी तक्रार या परिसरातील नागरिकांची आहे परंतु नगरपरिषद अधिकारी व पदाधिकारी कोणत्याही प्रकारची दखल घेत नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. जर सुशिक्षित नागरिकांचीच ही अवस्था आहे तर अशिक्षित नागरिकांचे काय होत असतील? असा प्रश्न या निमित्ताने उभा ठाकला आहे.
शहरातील विवेकानंद कॉलनी ही वार्ड क्र.१ मध्ये येते. या कॉलनीतील सनराईज शाळेसमोरील श्री.लव्हाळे पिठगिरणी पासून ते श्री.तेलमोरे यांचे घरापर्यंत खोदून ठेवलेल्या अपूर्ण नालीचे बांधकाम पुर्ण करण्याची मागणी अनेकदा केली आहे. नगरपरिषदेने सन् २०११ मध्ये या नालीचे बांधकाम केले आणि तेही अपूर्ण. नालीचे बांधकाम अपूर्ण असून सुध्दा कंत्राटदाराला मात्र पुर्ण देयक देण्यात आले. या परिसरातून घरातील निघणारे सांडपाणी या नालीमध्ये सोडले जाते परंतु हे सांडपाणी या नालीमध्येच तुंबलेले असते, अशा स्थितीत नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. या अपुर्ण नाली बांधकामामुळे मुले, प्रौढ व्यक्ती यांना मोठ्या प्रमाणात बाधा होत आहे. गेल्या १० वर्षांपासुन अतिशय क्षुल्लक अशा नालीचा प्रश्न जर नगरपालिकेकडून सोडल्या जात नसेल आणि नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत असतील तर मग आता न्याय मागावा तरी कुणाला? या प्रश्न या परिसरातील नागरिक विचारत असून येत्या ८ दिवसांच्या आंत जर हा प्रश्न मार्गी लावला नाही तर नगरपरिषदेसमोर आंदोलन छेडण्याचा इशारा जयराज दुपारे, प्रकाश कासोरदे, शशिकांत ओहळे, प्रा.एम.ए.अली, रामचंद्र नाडेकर, एस.डी.तागडे, प्रदीप अकर्ते, प्रा.तेलमोरे, सुनिल कासोरदे, विलास जावळे, कैलास कासोरदे, के.जी.देशमुख, एम.जी.इंगळे, एन.डी.खोडस्कर, अशोक चंदन, आर.आर.सावरकर, कल्पना जैन, प्रविण कांडलकर, संदीप बिजवे, विनोद राऊत, सुधाकर तागडे आदींनी दिला आहे.