मराठी

ई-संजीवनीद्वारे रुग्ण तपासणीची वेळ वाढली

गरजूंना ऑनलाईन आरोग्य सल्ला मिळवण्यासाठी उपयुक्त सेवा - पालकमंत्री एड. यशोमती ठाकूर

अमरावती, दि. 18 : कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांत नागरिकांना वैद्यकीय तपासणीसाठी ऑनलाईन सल्ला मिळण्यासाठी शासनाकडून ई- संजीवनी ओपीडी ही ऑनलाईन सेवा सुरू करण्यात आली. या सेवेची वेळ आणखी दोन तासांनी वाढविण्यात आली आहे. गरजूंना आरोग्य तज्ज्ञांकडून घरबसल्या वैद्यकीय सल्ला मिळवण्यासाठी या सेवेचा लाभ होत आहे, अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री एड. यशोमती ठाकूर (Minister Women Child Development District Guardian Minister Yashomati Thakur) यांनी आज दिली.

कोरोना साथीच्या व त्यानुषंगाने जारी करण्यात आलेल्या संचारबंदीच्या काळात रूग्णांना घरबसल्या आरोग्य सल्ला मिळावा या हेतूने ई- संजीवनी ओपीडी ही ऑनलाईन सेवा सुरू करण्यात आली असून, त्याचा लाभ अनेकांना होत आहे. ई-संजीवनी ओपीडीच्या माध्यमातून राज्यभरात आतापर्यंत सहा हजारपेक्षा अधिक रुग्णांनी लाभ घेतला आहे.

नागरिकांच्या सोयीसाठी दिवसातून दोन वेळेस ओपीडी सुरु करण्यात आली आहे. यापूर्वी सकाळी 9.30 ते दु. 1.30 या वेळेतच रुग्णांना ऑनलाईन सल्ला दिला जात होता. आता या वेळेत वाढ करुन दु. 3.00 ते सायंकाळी 5.00 या वेळेत देखील ओपीडी सुरु असणार आहे. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून विविध उपायांची अंमलबजावणी होत असतानाच आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न होत आहेत. माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून नव्या सुविधांची भर घालण्यात येत आहे. त्यानुसार लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना आरोग्यविषयक तपासणी, सल्ला घेताना येणारी अडचण लक्षात घेऊन ऑनलाईन ई-संजीवनी ओपीडी सेवा राज्यभर सुरू करण्यात आली. या माध्यमातून एखादा रूग्ण आपल्या आजाराबाबत माहिती देऊन डॉक्टरांचा सल्ला मिळवू शकतो. आता दुपारनंतरदेखील ओपीडी सुरू झाल्याने गरजूंना त्याचा लाभ मिळेल, असे पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी सांगितले.

या ऑनलाईन ई-संजीवनी ओपीडी सेवेचे मोबाईल एप देखील सुमारे 4 महिन्यांपूर्वी तयार करण्यात आले आहे. एंड्रॉइड आधारीत एप असल्याने त्याचा फायदा स्मार्ट फोन धारकांना होत आहे.

राज्यात एप्रिलमध्ये प्रायोगिक तत्वावर सुरू झालेली ही सेवा मे मध्ये पूर्णपणे सुरू करण्यात आली. त्यासाठी www.esanjeevaniopd.in या संकेतस्थळाला रुग्णांनी भेट दिल्यास त्यांना तज्ज्ञांचा सल्ला घेता येतो. राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातून कुठल्याही जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत संगणक, लॅपटॉप, मोबाईल यांचा वापर करून कुठल्याही आजारावर वैद्यकीय सल्ला, उपचार रुग्णाला घेता येतो.

  • एप डाऊनलोड करण्यासाठी लिंक:

https://play.google.com/store/apps/details?id=in.hied.esanjeevaniopd&hl=en_US

ई-संजीवनी ओपीडी एप :

1)   मोबाईल क्रमांकद्वारे नोंदणी केल्यावर ‘ओटीपी’ येतो. त्या माध्यमातून रुग्ण त्याचा नोंदणी अर्ज भरतो. त्यानंतर टोकनसाठी विनंती केल्यानंतर आजारासंबंधी काही कागदपत्रे, रिपोर्ट अपलोड केले जातात. त्यानंतर एसएमएसद्वारे रुग्णाला ओळखक्रमांक आणि टोकन क्रमांक प्राप्त होतो.

2) लॉगईनसाठी एसएमएसद्वारे नोटीफिकेशन येते. त्यानंतर रुग्णाला दिलेल्या ओळखक्रमांकाच्या आधारे लॉगईन करता येते.

3) डॉक्टरांशी चर्चेनंतर  लगेच ई-प्रिस्क्रीप्शन प्राप्त होते.

Related Articles

Back to top button