मराठी

एकनाथ खडसेंनी आधीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जायला हवं होतं

  • केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी काढला चिमटा

  • खडसे आधीच राष्ट्रवादीत गेले असते तर मंत्री झाले असते आता तिकडे सारे काही फुल आहे

मुंबई/दि.७ –  गेल्या अनेक दिवसांपासून नाराज असलेले भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमधील संभाव्य प्रवेशावरून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी एकनाथ खडसे यांना चिमटा काढला आहे. खडसे आधीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले असते तर मंत्री झाले असते, असे विधान आठवले यांनी केले आहे.
एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना रामदास आठवले म्हणाले की, एकनाथ खडसेंनी आधीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जायला हवं होतं. ते आधीच राष्ट्रवादीत गेले असते तर मंत्री झाले असते. आता तिकडे सारे काही फुल आहे. आता खडसेंनी रिपाईंमध्ये यावं, आपण दोघे मिळून आपलं सरकार आणू, असे आठवले म्हणाले.
दरम्यान, आज सकाळपासून एकनाथ खडसे मुंबईत शरद पवारांना भेटणार असं सांगितलं जातं होतं. याबाबत खुद्द शरद पवारांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, एकनाथ खडसेंबाबत अशी कोणतीही भेट नियोजित नाही, त्यांच्या भेटीबद्दल विनंतीही करण्यात आली नाही, उद्या मी दिल्लीला जाणार आहे. परंतु आज भेट नाही असं त्यांनी सांगितलं आहे. मात्र एकनाथ खडसे आज मुंबईत आहेत, वैद्यकीय तपासणीसाठी मुंबईत आल्याचं खडसेंनी सांगितलं, त्याचसोबत मी लपून छपून कोणाची भेट घेणार नाही, वैद्यकीय तपासणीनंतर अजून कुणाला भेटावं हे नक्की नाही असं एकनाथ खडसेंनी सांगितल्यानं संभ्रम निर्माण झाला होता.
पद काय मिळते ते बघून निर्णय घेऊ- खडसेंची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने उडाली होती खळबळ
खडसे यांना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारीणीतही स्थान न दिल्यामुळे त्यांची नाराजी अधिकच वाढली. त्यात त्यांना काही कार्यकर्ते फोन करून योग्य निर्णय घ्या, अशी मागणी करीत आहे. अशाच प्रकारे भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील रोशन भंगाळे या कार्यकर्त्याने खडसेंशी संपर्क साधून पक्ष सोडण्याविषयी चर्चा केली. ही ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यानंतर हा तरुण नॉट रिचेबल झाला होता.

Back to top button