मराठी

राज्यसभेच्या ११ जागांची निवडणूक जाहीर

नवी दिल्ली/दि.१३ – राज्यसभेच्या उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील ११ जागांसाठी निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. यामध्ये उत्तर प्रदेशमधील दहा आणि उत्तराखंडमधील एका जागेचा समावेश आहे. या सर्व ११ जागांवर २७ ऑक्टोबर रोजी नामांकन अर्ज दाखल केले जातील. तर नऊ नोव्हेंबर रोजी मतदान होईल. मतदानाच्या दिवशीच मतमोजणी होईल आणि निकाल ११ नोव्हेंबर रोजी जाहीर केला जाईल. उत्तर प्रदेशमधील राज्यसभेच्या दहा सदस्यांचा कार्यकाळ हा २५ नोव्हेंबर रोजी समाप्त होणार आहे.यामधील बहुतांश सदस्य हे समाजवादी पक्षाचे आहेत. सपचे चंद्रपाल यादव, रवि प्रकाश वर्मा, विश्वंभर प्रसाद निषाद, जावेद अली खान, प्रा. रामगोपाल यादव यांचा कार्यकाळ समाप्त होत आहे. भाजपच्या कोट्यातील अरुण सिंह आणि नीरज शेखर यांच्या जागा रिक्त होत आहेत. याशिवाय बसपचे वीर सिंह आणि राजाराम तसेच काँग्रेसचे पीएल पुनिया यांचाही कार्यकाळ समाप्त होत आहे. काँग्रेसचे उत्तराखंडमधील राज्यसभा खासदार राज बब्बर यांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. उत्तर प्रदेश विधानसभेमध्ये सध्या एकूण ३९५ सदस्य आहेत, तर आठ जागा रिक्त आहेत. त्यापैकी सात जागांवर पोटनिवडणूक होणार आहे.
या निवडणुकीत विजयासाठी प्रत्येक सदस्याला ३७ मतांची गरज आहे. उत्तर प्रदेश विधानसभेत सध्या भाजपकडे ३०६ आमदार आहेत, तर अपना दलच्या नऊ आणि तीन अपक्ष आमदारांचा भाजपाला पाठिंबा आहे. तर विरोधी पक्षात असलेल्या सपकडे ४८, काँग्रेसकडे ७, बसपकडे १८ आणि ओमप्रकाश राजभर यांच्यापक्षाकडे ४ सदस्य आहेत. आकडेवारीनुसार उत्तर प्रदेशमधील राज्यसभेच्या दहा पैकी आठ जागांवर भाजपाला सहज विजय मिळू शकतो. त्याशिवाय भाजपला अजून काही आमदारांचा पाठिंबा मिळाल्यास भाजपला नवव्या जागेवरही सहजपणे विजय मिळू शकतो, तर सपला आपल्या सदस्यसंख्येनुसार सपला एका जागेवर विजय मिळू शकतो. तर बसप आणि काँग्रेसला एकाही जागेवर विजय मिळण्याची शक्यता नाही. या निवडणुकीत सपला पाच जागांवर तर बसपला दोन जागांवर नुकसान होण्याची शक्यता आहे. भाजपला सहा ते सात जागांवर फायदा होण्याची चिन्हे आहेत. राज्यसभेमध्ये सध्या एकूण २४५ सदस्य आहेत. त्यामध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला शंभरहून अधिक सदस्यांचा पाqठबा आहे. राज्यसभेत भाजपचे ८५, संयुक्त जनता दलाचे पाच, बीपीएफ १, आरपीआय १, एनपीएफ १, एमएनएफ १ आणि राष्ट्रपती नियुक्त ७ असे मिळून राष्ट्रीय लोकशाही आघाडीला १०१ सदस्यांचा पाqठबा आहे. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील ११ पैकी दहा जागांवर भाजपला यश मिळाल्यास हा आकडा १२० पर्यंत जाईल. त्यामुळे राज्यसभेत पहिल्यांदाच बहुमताजवळ जाण्याची संधी भाजपकडे असेल.

Related Articles

Back to top button