अकरावीच्या विद्यार्थ्यांनो, ऑनलाईन वर्ग सुरू होणार!

पुणे/दि.१– इयत्ता अकरावी प्रवेशाच्या प्रतिक्षेत आहात का? की तुमचा ऑनलाइन किंवा थेट महाविद्यालयातून ऑफलाइन पद्धतीने प्रवेश झाला आहे. मात्र, कनिष्ठ महाविद्यालय सुरू झाले नाही. म्हणून तुम्हाला अकरावीच्या शैक्षणिक वर्षाचे, अभ्यासक्रमाचे टेन्शन आले आहे का? मग इकडे लक्ष द्या. तुमच्यासाठी आता येत्या सोमवारपासून (ता.2) ऑनलाइन वर्ग सुरू होणार आहेत.होय, आता अकरावीत प्रवेश घेतलेल्या आणि प्रवेशाच्या प्रतिक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांचे देखील ऑनलाइन शिक्षण सुरू होणार आहे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने यासाठी पुढाकार घेतला असून या ऑनलाइन वर्गांसाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना “https://covidv~.scertmaha.ac.in/eleventh” येथे नावनोंदणी करण्याचे आवाहन राज्य परिषदेने केले आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून रखडलेल्या अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये अद्यापही संभ्रम आहेत. परंतु सध्या संभ्रमावस्थेत असणाऱ्या या पालकांना काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्न शालेय शिक्षण विभागातर्फे सुरू झाले आहेत. बऱ्याच शहरांमध्ये प्रवेश प्रक्रिया पूर्ण झालेली नसतानाही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून शिक्षण विभागाने अकरावीचे ऑनलाइन वर्ग सुरू करण्यासाठी पावले उचलली आहेत. मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने ही प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या पावणे दोन महिन्यांपासून ही प्रवेश प्रक्रिया ठप्प आहे. राज्यातील विविध संघटना आणि पालकांनी ही प्रवेश प्रक्रिया सुरू करावी अशी मागणी लावून धरली होती. परंतु त्याबाबत सरकारने कोणतीही पावले अद्याप उचललेली नाहीत. दरम्यान, नोव्हेंबर महिना उजडला तरी अद्याप कनिष्ठ महाविद्यालये सुरू न झाल्याने अकरावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती वर्तविली जात होती. याची दखल घेत आता शालेय शिक्षण विभागातर्फे इयत्ता अकरावी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी उच्च माध्यमिक विद्यालये/कनिष्ठ महाविद्यालये सुरू होईपर्यंत येत्या सोमवारपासून मराठी व इंग्रजी माध्यमाचे ऑनलाईन वर्ग सुरू होणार आहेत. नावनोंदणी केल्यानंतर ऑनलाइन वर्गांचे वेळापत्रक आणि आवश्यक तपशील विद्यार्थ्यांनी नोंदविलेल्या ई-मेल आणि मोबाईल क्रमांकावर दिले जाणार आहेत.
अकरावीसाठी प्रवेश घेतलेल्या आणि अद्याप प्रवेश न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी हे ऑनलाइन वर्ग (क्लासेस) असणार आहेत. या ऑनलाइन वर्गांसाठी 80 प्राध्यापकांचा गट नेमण्यात आला आहे. या गटातील प्राध्यापक त्यांच्या महाविद्यालयातून अकरावीचे लेक्चर ऑनलाइनद्वारे लाइव देतील. एससीईआरटीच्या यु-ट्यूब चॅनलवर देखील हे ऑनलाइन लेक्चर उपलब्ध असणार आहेत.”
– दिनकर पाटील, संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद