मराठी

ई-कॉमर्स कंपन्यांत रोजगारवृद्धी

मुंबई/दि. १३ – कोरोना विषाणूमुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे ई-कॉमर्स कंपन्यांसह किराणा, औषध आणि इतर उत्पादनांची मागणी वाढली आहे. ईकॉम एक्स्प्रेसने ही उत्पादने वितरीत करण्यासाठी गेल्या काही महिन्यांत 7500 लोकांना काम दिले. कोरोनापूर्वी या कंपनीत 23 हजार कर्मचारी होते. ऑगस्टच्या सुरुवातीस, कामगार संख्या तीस हजार पाचशेपर्यंत वाढली.

ईकॉम एक्स्प्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष सौरभ दीप सिंगला म्हणतात, की कोरोना साथीने ई-कॉमर्स उद्योगाला वेगळ्या लीगमध्ये ढकलले आहे. आमच्या ई-कॉमर्स ग्राहकांनी उत्सवाच्या हंगामासाठी आक्रमक योजना तयार केल्या आहेत. आम्ही त्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. आम्ही कामगार घेण्यास सुरुवात केली असून ही प्रक्रिया दहा ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. आम्ही सणांपूर्वी 30 हजाराहून अधिक हंगामी रोजगार निर्मितीची अपेक्षा करीत आहोत. सिंगला म्हणाले, की मागील वर्षी सणाच्या हंगामापूर्वी आम्ही 20 हजार लोकांना कामावर घेतले होते. उत्सवाचा हंगाम संपल्यानंतर, मागणी कायम ठेवत तात्पुरत्या कामगारांपैकी एक तृतीयांश कामगारांना कायमस्वरूपी नोक-या देण्यात आल्या. ई-कॉमर्स कंपन्या जास्त ऑर्डर पूर्ण करण्यासाठी सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले. अलीकडे फ्लिपकार्टने पुरवठा साखळी व वितरण क्षमता वाढविण्यासाठी 50 हजार किराणा दुकान आपल्या व्यासपीठाशी जोडली आहेत. त्याचबरोबर ॲमेझॉन इंडियाने पाच नवीन शॉर्ट सेंटरची भर घालण्याची घोषणा केली आहे.
सिंगल यांचे म्हणणे आहे, की या नोक-या केवळ मेट्रो शहरांमध्ये किंवा टियर -एक शहरांमध्ये दिल्या जाणार नाहीत. त्याऐवजी दुर्गम भागात डिलिव्हरीसाठी टियर -2 शहरांमध्ये लोकांना कामावर घेतले जाईल. ते म्हणाले, की त्यात मोठ्या संख्येने फ्रेशर्स असतील. ज्यांना स्थानिक भूगोल समजतो, त्यांना स्थानिक बाजारात विविध मार्केटमध्ये नोकरी दिली जाईल. कंपनीच्या वितरण सेवेमध्ये दुप्पट वाढ झाली आहे आणि उत्सवाच्या हंगामात आणखी सेवा विस्तार करावा लागेल.

Related Articles

Back to top button