मराठी

गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जेष्ठ गायिका उषा मंगेशकर यांना जाहीर

निवड एकमताने केल्याचं कळत

मुंबई/दि.२८ – महाराष्ट्र राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे देण्यात येणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जेष्ठ गायिका उषा मंगेशकर यांना जाहीर झाला आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी याबाबतची घोषणा केली. 5 लाख रुपये, मानपत्र, स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीनं सन 2020-21 या वर्षासाठी देणाऱ्या येणाऱ्या या पुरस्कारासाठी ही निवड एकमताने केल्याचं कळत आहे.
उषा मंगेशकर यांनी संगीत विश्वात दिलेल्या योगदानाबाबत सांगावं तर, त्यांनी आतापर्यंत अनेक मराठी, हिंदी यांसह इतरही अनेक भाषांमध्ये शेकडो सुमधुर गाणी गायली आहेत. सुबह का तारा, जय संतोषी माँ, आझाद, चित्रलेखा, खट्टा मीठा, काला पत्थर, नसीब, खुबसूरत, डिस्को डान्सर, इनकार अशा अनेक हिंदी चित्रपटांतील त्यांनी गायलेली गाणी प्रचंड गाजली.
मराठीत दादा कोंडके यांच्या चित्रपटांसाठी त्यांनी गायलेली सर्वच गाणी आणि राम कदम यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली गायलेल्या लावण्यांना रसिकांची विशेष दाद मिळाली. त्यांनी अनेक चित्रपटांसाठी गायलेल्या लावण्यांमधील गावरान ठसका रसिकांना विशेष भावला. त्यांनी गायलेली असंख्य भावगीतं आणि भक्तीगीतंही अतिशय लोकप्रिय आहेत.
सांस्कृतिक कार्य मंत्र्यांकडून हा पुरस्कार मिळाल्याबद्दल उषा मंगेशकर यांचं अभिनंदन करण्यात आलं. हा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार शासनाने आपल्याला प्रदान करण्याचे घोषित केल्याबद्दल, उषाताई मंगेशकर यांनी आनंद व्यक्त केला. त्यातही लतादीदीच्या वाढदिवसाच्याच दिवशी या पुरस्काराची घोषणा करण्यात आल्यामुंळ त्याचं महत्त्व अधिकच.

Related Articles

Back to top button