जिल्ह्यातील उद्योजक व बेरोजगार उमेदवारांनी महास्वयंम वेबपोर्टल चा लाभ घ्यावा
जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांचे आवाहन
अमरावती दि.1 : जिल्ह्यातील उद्योजक औद्योगिक आस्थापना व इतर आस्थापना यांनी कौशल्य विभागाच्या www.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर उपलब्ध सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल (Collector Shailesh Nawal) यांनी जिल्हा कौशल्य विकास कार्यकारी समितीच्या बैठकीत केले.जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीला अमरावती महानगर पालीकेचे आयुक्त प्रशांत रोडे, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी श्री.विसाळे, अमरावती विद्यापीठ इंक्युबेशन सेंटरचे संचालक डि.टी.इंगोले, अमरावती एमआयडीसी असोसिएशनचे प्रतिनिधी, सहाय्यक आयुक्त तथा सदस्य सचिव जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता प्रफुल शेळके आदी उपस्थित होते. या बैठकीत अमरावती जिल्ह्यातील जिल्हा कौशल्य विकास आराखड्यास मंजुरी देण्यात आली तसेच किमान कौशल्य विकास आराखड्यात मंजुरी देण्यात आली
महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या सर्व सेवा आता www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने विनामूल्य पुरवण्यात येतात त्यामुळे अत्यल्प श्रम,वेळ व विनामूल्य विविध सुविधांचा लाभ मिळू शकतो. हे संकेतस्थळ वापरकर्त्यांसाठी समजण्यास अतिशय सुलभ असून पुरविण्यात आलेल्या सर्व सुविधा गरजु उमेदवार तसेच उद्योजकांसाठी निश्चितच उपयुक्त आहे.
या संकेतस्थळाद्वारे उमेदवारांसाठी पुरवण्यात आलेल्या सुविधा प्रामुख्याने खालील प्रमाणे आहे :
- नाव नोंदणी करणे,आपल्या प्रोफाईलमध्ये शैक्षणिक पात्रतेतील वाढ अथवा अनुभव नोंदविणे, पत्ता, संपर्क क्रमांक, ईमेल यामध्ये दुरुस्ती करणे, नूतनीकरण करणे आधार कार्ड लिंक करणे पासवर्ड रिसेट करणे. शासकीय अथवा खासगी अनुसुचित रिक्त पदांची माहिती मिळविणे,त्यासाठी उमेदवारी अर्ज सादर करणे.
- राज्यभरातील आयोजित विविध रोजगार मेळ्याव्याची माहिती मिळविणे व त्यासाठी उत्सुकता व पसंतीक्रम नोंदविणे.
- रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी म्हणून सहभाग नोंदविणे.
- केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कौशल्य विकास योजना व कौशल्य प्रशिक्षण देणाऱ्या संस्था यांची माहिती प्राप्त करणे आणि सहभाग घेणे.
- अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या स्वयंरोजगारासाठी योजनांची माहिती मिळविणे व लाभ घेण्यासाठी उचित योजनेअंतर्गत प्रकरण सादर करणे.
उद्योजकांसाठी उपलब्ध असलेल्या सुविधा :
- उद्योजक म्हणून नोंदणी करणे,नवीन प्लांट अथवा शाखेची स्वतंत्र नोंद करणे.
- प्रोफाईल अद्ययावत करणे,(पत्ता संपर्क अधिकारी,दूरध्वनी भ्रमणध्वनी क्रमांक,ईमेल आयडी यामध्ये दुरुस्ती करणे) पासवर्ड रिसेट करणे.
आस्थापनांमध्ये वेळेवाडी निर्माण होणारी रिक्त पदे अधिसूचित करणे :
- नोंदविलेल्या मागणीनुसार सिस्टिमद्वारे पुरस्कृत प्राप्त पात्र उमेदवारांची यादी मिळविणे.विनामूल्य या पदांची प्रसिद्धी करणे.
- सदर यादी पीडीएफ किंवा एक्सल शीट मध्ये डाऊनलोड करणे.
- मुलाखती आयोजित करणे.
- प्राथमिकरित्या निवडलेल्या उमेदवारांना सिस्टिमद्वारे विनामूल्य एसएमएस पाठवण्याची सुविधा
- मुलाखत प्रक्रियेनंतर रुजू झालेल्या उमेदवारांचे प्लेसमेंट नोंदविणे.
- सी.एन.व्ही 1959 अंतर्गत बंधनकारक असलेले त्रैमासिक मनुष्यबळ विवरणपत्र ER-1 ऑनलाइन सादर करणे.
- विविध रोजगार मेळावा यांची सर्वकष माहिती मिळविणे त्यासाठी रिक्त पदे अधिसूचित करून थेट सहभाग नोंदविण्याचे सुविधा.
- रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम योजनेमध्ये सहभाग घेणे, प्रशिक्षणार्थी निवडणे त्यांना योजनेमध्ये समाविष्ट होण्यास अनुमती देणे, उमेदवारांची मासिक उपस्थिती नोंदविणे,विद्यावेतन प्रतिपूर्ती (क्लेम) मागणे सादर करणे ही सर्व कामे ऑनलाइन पद्धतीने करता येतात. यासाठीचे विद्या वेतनाच्या प्रतिपूर्ती चे सर्व क्लेम आरटीजीएस पद्धतीने थेट उद्योजकांच्या खात्यात विनाविलंब जमा करण्यात येतात.
- महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी तसेच केंद्र शासनामार्फत जिल्हा कार्यालयाव्दारे राबविण्यात येत असलेले विविध कौशल्य विकास कार्यक्रम राबविणे व त्यामध्ये सहभाग घेणे.
याशिवाय उद्योजकांसाठी विविध शैक्षणिक पात्रता व कौशल्य प्राप्त नोंदणीकृत होतकरू उमेदवारांच्या नोंदणी पट आणि उमेदवारांसाठी सर्व वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंत नोंदणीकृत उद्योजकांच्या नोंदणी पट उपलब्ध आहेत तसेच विविध अल्पमुदती प्रशिक्षण देणाऱ्या व्ही.टी.पी ची यादी जिल्हा निहाय उपलब्ध आहे.
सद्यस्थितीत कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील बहुतांश कामगार,कर्मचारी स्थलांतरित झाल्यामुळे अनेक कारखाने आस्थापनांना मनुष्यबळाची कमतरता भासत आहे.तसेच जिल्ह्यात विविध पात्रताधारक अनेक नोकरी इच्छुक बेरोजगार युवक,युवती देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. अशा परिस्थितीत उमेदवार आणि उद्योजक या दोघांकरिता ही विनामूल्य रोजगार मिळविणे तसेच उद्योजकांना मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची उत्तम संधी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या www.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर ऑनलाइन रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातूनही उपलब्ध होते.
अमरावती जिल्ह्यातील मनुष्यबळाची गरज असणाऱ्या सर्व औद्योगिक आस्थापना उद्योग विविध सेवा पुरविणाऱ्या कंपनी,हॉस्पिटल्स,मॉल्स व इतर सर्व आस्थापनांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर नोंदणी करावी जेणेकरून उद्योगांना आवश्यक मनुष्यबळ त्वरित उपलब्ध होऊ शकेल याबाबत काही अडचण आल्यास जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अमरावती यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे.