नगर दि ६ :- सरकार इथेनॉलच्या दरात प्रतिलिटर तीन रुपयांची वाढ करू शकते. पेट्रोलियम मंत्रालयाने मंत्रिमंडळाकडे यासंबंधीचा प्रस्ताव पाठविला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वाढलेली किंमत एक डिसेंबरपासून लागू करण्याचा प्रस्ताव आहे. दरम्यान, महाराष्ट्रात साखर उत्पादनात २५ टक्के घट करून इथेनाॅलच्या उत्पादनावर भर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे साखर कारखान्यांना फायदा होणार आहे.
सध्या इथेनॉलची किंमत प्रतिलिटर 43.75 रुपये आहे. इथेनॉल एक प्रकारचे अल्कोहोल आहे, जे पेट्रोलमध्ये मिसळल्यानंतर वाहनांमध्ये इंधनासारखे वापरले जाऊ शकते. इथेनॉल हे मुख्यत: उसापासून तयार केले जाते; मात्र इतरही बऱ्याच शर्करा असलेल्या पिकांमधून ते तयार केले जाऊ शकते. याचा फायदा शेती आणि पर्यावरणालाही होतो. भारतीय क्षेत्राच्या संदर्भात इथेनॉल हा उर्जेचा अक्षय स्त्रोत आहे. कारण भारतात उसाच्या पिकाची कमतरता कधीच भासू शकत नाही. अशा परिस्थितीत इथेनॉलच्या वाढीव किंमतींचा शेतकऱ्यांना फायदा होईल. कारण साखर कारखानदार ऊस उत्पादकांची थकबाकी सहज देऊ शकतील.
एक डिसेंबरपासून इथॅनॉलचे दर प्रतिलीटर तीन रुपयांनी वाढू शकतात. पुढील हंगामात इथेनॉलचे उत्पादन दुप्पट होण्याची शक्यता आहे. उत्पादन वाढीमुळे पेट्रोलमध्ये आठ टक्के इथेनॉल मिसळण्याचे लक्ष्य सरकार पूर्ण करू शकेल. सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रीय जैवइंधन धोरणांतर्गत 2022 पर्यंत 10 टक्के आणि 2030 पर्यंत 20 टक्के इथेनॉल मिसळण्याचे लक्ष्य आहे. ऑईल मार्केटिंग कंपन्या चिनी कंपन्यांकडून इथेनॉल कोणत्या किंमतीवर खरेदी करतात, हे सरकार ठरवते. इथेनॉलचा वापर 35 टक्के कमी कार्बन मोनोऑक्साइड उत्सर्जित करतो. एवढेच नव्हे, तर कार्बन मोनोऑक्साइड उत्सर्जन आणि सल्फर डाय ऑक्साईडदेखील कमी करते. या व्यतिरिक्त इथेनॉल हायड्रोकार्बन उत्सर्जनदेखील कमी करते. इथेनॉलमध्ये 35 टक्के ऑक्सिजन असतो. इथेनॉल इंधन वापरल्याने हवेतील नायट्रोजन ऑक्साईड उत्सर्जनदेखील कमी होते.
इथेनॉल हे पर्यावरणपूरक इंधन आहे आणि ते जीवाश्म इंधनांच्या धोक्यांपासून पर्यावरणाचे रक्षण करते. हे इंधन उसापासून तयार केले जाते. कमी किमतीत अधिक ऑक्टन संख्या देते आणि एमटीबीईसारख्या घातक इंधनांसाठी पर्याय म्हणून कार्य करते. त्यामुळे इंजिनची उष्णतादेखील नष्ट होते. पेट्रोलसह ई 85 पर्यंत अल्कोहोल-आधारित इंधन तयार होते.
-
साखर उद्योगासाठी हितकारक
देशात साखर अतिरिक्त आहे. निर्यातही अपेक्षेप्रमाणे झालेली नाही. या पार्श्वभूमीवर साखरेचे उत्पादन कमी करून थेट उसाच्या रसापासून इथेनाॅलनिर्मिती करण्याचा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला होता. त्यांचा हा सल्ला आता केंद्रव सरकारच्या निर्णयानंतर साखर उद्योगाच्या पथ्थ्यावर पडणार आहे.