मराठी

कोरोनाविरुध्दच्या लढाईत प्रत्येकाने सहकार्य करावे

- पालकमंत्री संजय राठोड

  • स्वातंत्रदिनाचा मुख्य शासकीय कार्यक्रम

  •  डॉक्टर, पोलिस, युपीएससी यशवंत, सफाई कामगार आदींचा सत्कार

यवतमाळ/दि.15 – कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे आपला देश, राज्य आणि जिल्हासुध्दा ढवळून निघाला आहे. गत सहा महिन्यांपासून नागरिकांच्या सेवेसाठी राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाचे सर्व विभाग ‘कोरोना योद्धे’ म्हणून लढाई लढत आहे. मात्र ही केवळ शासन – प्रशासनाची लढाई नाही तर प्रत्येकाची आहे. त्यामुळे या लढाईत प्रत्येक नागरिकाने सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे वने, भुकंप पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात भारतीय स्वातंत्र्याच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहणाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जि.प.अध्यक्षा कालिंदा पवार, आमदार दुष्यंत चतुर्वेदी, नगराध्यक्षा कांचन चौधरी, जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलिस अधिक्षक‍ एम. राजकुमार, अपर जिल्हाधिकारी सुनील महिंद्रीकर, अपर पोलिस अधिक्षक नुरुल हसन, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे आदी उपस्थित होते.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव ओळखून जिल्हा प्रशासनाने सुरवातीपासूनच अतिशय तातडीच्या उपाययोजना आखल्या, असे सांगून पालकमंत्री म्हणाले, लॉकडाऊनच्या काळात संपूर्ण पोलिस विभाग नागरिकांच्या आरोग्यासाठी दिवसरात्र रस्त्यावर दिसू लागला. यवतमाळ जिल्ह्यात आज मृत्युच्या संख्येने अर्धशतक ओलांडले आहे. जिल्ह्यातील मृत्युदर 2.68 टक्के आहे. मात्र असे असले तरीसुध्दा एकही मृत्यु होऊ न देणे यालाच आरोग्य यंत्रणेचे आणि जिल्हा प्रशासनाचे प्राधान्य आहे.

जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 63 टक्के आहे. आतापर्यंत जवळपास 1400 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. वैद्यकीय महाविद्यालयात 3 कोटी रुपये खर्च करून ‘विषाणू संशोधन व रोगनिदान प्रयोगशाळा’ (व्हीआरडीएल) सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नमुन्यांची चाचणी होत आहे. आतापर्यंत 29 हजार चाचण्या करण्यात आल्या आहेत. याशिवाय जलदगतीने चाचण्या होण्यासाठी 2 कोटी रुपये उपलब्ध करून दिले. यातून 32 हजार 500 एन्टीजन टेस्ट किट विकत घेतल्या असून आणखी 30 हजार किट घेण्यासाठी मंजूरी देण्यात आली आहे.

जिल्ह्यात 92 फिवर क्लिनीक, 37 कोव्हीड केअर सेंटर, 6 कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 1 कोव्हीड हॉस्पीटल कार्यरत आहे. जिल्ह्यात ‘होम आयसोलेशन’ ची सुरुवात झाली आहे. रुग्णांना इतरत्र खाजगी रुग्णालयात उपचार करायचे असेल तर शासनाच्या मार्गदर्शक सुचनांच्या अधीन राहून परवानगी देण्यात येत आहे. प्रशासन नागरिकांसाठी झटत आहे, त्यामुळे नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखून शासन आणि प्रशासनाच्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे. अनावश्यकपणे बाहेर पडू नये, आपल्या घरातच सुरक्षित राहावे, बाहेर पडतांना नियमितपणे मास्कचा वापर करावा. हात वारंवार स्वच्छ धुवावे. कोरोनाची मानवी साखळी तोडण्यासाठी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

प्रशासनाच्या उपलब्धीबाबत ते पुढे म्हणाले, कापूस खरेदीमध्ये यवतमाळ जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे.  महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आतापर्यंत 78304  शेतक-यांच्या खात्यात कर्जमाफीचे 579 कोटी 38 लाख रुपये जमा झाले आहे. जिल्ह्यामध्ये 1 लाख 48 हजार 469 शेतकऱ्यांना 1172 कोटी 5 लाख रुपये खरीप पीक कर्जवाटप करण्यात आले आहे. कोरोना आपत्तीमुळे गरीब व गरजू लोकांसाठी राज्य शासनाने 1 एप्रिलपासून केवळ पाच रुपयात शिवभोजन थाळी उपलब्ध करून दिली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे 3 लाख 25 हजार 352 नागरिकांनी शिवभोजन योजनेचा लाभ घेतला आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते शहीद कुटुंबातील वीर नारींचा सन्मानपत्र, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यात वीर नारी राधाबाई रामकृष्ण्‍ बोरीकर, मंगला देवचंद सोनवणे, नंदाबाई दादाराव पुराम, सुनिता प्रकाश विहिरे यांचा समावेश होता. तसेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) परीक्षेत यशाचे मानकरी ठरलेले जिल्ह्यातील अजहरोद्दीन काजी जहिरोद्दीन काजी, अभिनव इंगोले, प्रज्ञा खंडारे, सुमीत रामटेके यांना भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन पालकमंत्र्यांनी त्यांचा सत्कार केला. सोबतच कोरोनाविरुध्द लढणारे डॉक्टर्स, आरोग्य सेवक, नर्स, सफाई कर्मचारी, विशेष पोलिस पदकाने सन्मानीत अधिकारी व कर्मचारी, राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेत जिल्ह्यातील निवड झालेला अंश प्रवीण इंगळे आणि यवतमाळचे दूरदर्शनचे स्ट्रींजर आनंद कसंबे यांचादेखील सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे संचालन चंद्रबोधी घायवटे आणि ललिता जतकर यांनी केले. यावेळी स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक व त्यांचे कुटुंबीय, वीर माता, वीर पिता, वीर पत्नी, इतर विभागाचे अधिकारी व कर्मचारी, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

 

Related Articles

Back to top button