मराठी

धार्मिकस्थळे खुली करण्यास अत्यंत सावधगिरी बाळगावी लागणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले

मुंबई/दि.३– कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यात संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. या काळात देशभरातील सर्व धार्मिक स्थळेही बंद करण्यात आली. महाराष्ट्रील धार्मिक स्थळे तेव्हापासून बंदच आहेत. यानंतर लॉकडाउनमधून बाहेर पडण्यासाठी अनलॉकची घोषणा करत, देशातील आणि राज्यातीलही एक एक क्षेत्र लॉकडाउनमधून मुक्त करण्यास सुरूवात झाली. मात्र देशात अनेक ठिकाणची मंदिरे अद्यापही बंदच आहेत. याच मुद्द्यावर आता महाराष्ट्रातीलमंदिरे तसेच इतर धार्मिक स्थळेही खुली करावीत, या मागणीने जोर धरला आहे. मात्र आता यावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य करत आपल्या मनात काय आहे, ते सांगितले आहे.
मंदिरे आणि धार्मिकस्थळे खुली करण्यसंदर्भात विनंत्या येत आहेत. मात्र, त्यासाठी अत्यंत सावधगिरी बाळगावी लागणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. मंदिरे खुली करण्यासंदर्भात ठाकरे यांनी थेट भाष्य न केल्याने, तूर्तास तरी राज्यातील मंदिरे बंदच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आज पुणे विभागातील सांगली, सातारा आणि कोल्हापूर येथीळ कोरोनासंदर्भातील उपाययोजनांचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. तेव्हा ते बोलत होते.
तत्पूर्वी, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी, मंदिरे खुली करण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा ठाकरे सरकारला दिला आहे. यासंदर्भात त्यांनी सरकारला पत्रही लिहिले आहे. यावर, मंदिरे खुली करण्याची मुख्यमंत्र्यांची मनापासून इच्छा आहे. ते लवकरच यासंदर्भात निर्णय घेणार असल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले होते. राऊत यांनी ही प्रतिक्रिया द्यायला तासही होत नाही, तोच मुख्यमंत्री ठाकरे यांनी मंदिरांसंदर्भात आपण काय विचार करत आहोत, हे स्पष्ट केले आहे.
यापूर्वी, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही विठ्ठल मंदिराचे आंदोलन केले. यावेळी, आठ दिवसात मंदिरे खुली करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले असल्याचेही त्यांनी सांगितले होते. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या आजच्या भाष्यावरून सध्या तरी मंदिरे खुली होणार नाहीत, असाच संकेत मिळत आहे.
इतर देशांच्या तुलनेत आपल्यासमोरील आव्हान मोठे –
इतर देश फक्त कोविड एके कोविडचाच सामना करत आहेत. आपले तसे नाही. आपल्याकडे नुकताच गणेशोत्सव पार पडला, मोहरम झाला, आता नवरात्र, दसरा आणि दिवाळी आहे. त्यातच पाऊसही सुरू आहे. यामुळे आपले आव्हान अधिक मोठे आहे. हा कसोटीचा काळ आहे, असेही ठाकरे म्हणाले.
पश्चिम महाराष्ट्रात कोविडचा वाढता संसर्ग ही चिंतेची बाब आहे. मुंबई आणि ठाण्यानंतर, आता ही साथ सांगली, सातारा आणि कोल्हापूरकडे सरकत आहे. हे निश्चितच जबाबदारी वाढवणार आहे. आपल्याकडे म्हण आहे, पुढच्यास ठेच, मागचा शहाणा, तसेच, करोनासोबतच्या लढ्यात इतर काही जिल्ह्यांकडून ज्या चुका झाल्या त्या तुम्ही करू नका. असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button