मराठी

राज्यात अतिवृष्टीने प्रचंड नुकसान, ४४ जणांचा मृत्यू 

  • अतिवृष्टी आणि पूरस्थितीचा आढावा

  • मुख्यमंत्र्यांनी दिले पंचनामे करण्याचे निर्देश

  • शेतक:यांना सरसरकट मदतीची अपेक्षा

मुंबई/दि. १६  – अतिवृष्टीमुळे राज्यात मृत्यूचं तांडव पाहायला मिळाले. मुसळधार पावसामुळे विविध ठिकाणी तब्बल ४४ जणांनी गमावला आहे. सर्वाधिक जीवितहानी पश्चिम महाराष्ट्रात झाली आहे. अतिवृष्टी दरम्यान पुणे विभागात २८ जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी २७ जणांचे मृतदेह सापडले आहेत. एकाचा शोध सुरु आहे. मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये १६ जणांचा मृत्यू झाला.
सोलापूरमध्ये सर्वाधिक १४ जणांचा मृत्यू
पुणे विभागात अतिवृष्टीमध्ये एकूण २८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक मृत्यू सोलापूर जिल्ह्यात झाले आहेत. सोलापूरला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला.
मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये १६ जणांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यापैकी सर्वाधिक मृत्यू बीड जिल्ह्यात झाले आहेत. विदर्भात देखील अनेक ठिकाणी वीज पडल्याने जीवितहानी झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
खरीप हंगामातील पिकांची काढणी सुरु असताना झालेल्या पावसामुळे कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात नुकसान झाले आहे. सोयाबीन, भात, कापूस, ऊस, हळद, तूर आदी पिकांचं नुकसान झालं आहे. अतिवृष्टीमुळं झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतक:यांना शासनानं आणि पीक विमा कंपन्यांनी नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतक:यांकडून करण्यात येत आहे.
नुकसानीचे पंचनामे तातडीने करा
पिकांचे आणि मालमत्ता नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत आणि मनुष्यहानी होऊ नये यासाठी सतर्क राहण्याचे निर्देशही दिले आहेत. उस्मानाबाद, सोलापूर, पंढरपूर आणि बारामती या चार ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या(एनडीआरफ) तुकड्या तैनात केल्या आहेत. तसेच वायुसेना, नौदल, लष्कर यांना तातडीच्या मदतीसाठी हाय अलर्टवर सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
कोकणासह पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्याच्या अनेक भागांना  अतिवृष्टीने झोडपले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. पिकांचे नुकसान याबाबत तसेच घरांची पडझड, मालमत्तांचे नुकसान यांचेही तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले आहेत. पंढरपुरातील कुंभार घाट येथे अतिवृष्टीमुळे भिंत कोसळून सहा जणांचा मृत्यू झाल्याच्या दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांनी दु:ख व्यक्त केले आहे. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना तातडीची आर्थिक मदत देण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
मुख्यमंत्री सचिवालयासह विभागीय आयुक्तालय, जिल्हाधिकारी यांच्याशी  समन्वय राखण्यात यावा. आवश्यक त्या ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकड्या तैनात करण्यात याव्यात आणि  मदतीसाठी अग्निशमन, पोलीस, महसूल आणि वैद्यकीय अशा सर्वच विभागांना मदत पथके पाठविण्याबाबतही मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत. महसूल, कृषी, मदत व पुनर्वसन या विभागांसह आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय मदतीसह अन्य मदत पोहोचविण्यासाठी यंत्रणांना सज्जतेचे निर्देश देण्यात आले आहेत.
नैसर्गिक आपत्तीत राज्य सरकार शेतक:यांच्या पाठिशी
* केंद्रानेही मदत द्यावी – बाळासाहेब थोरात
परतीच्या पावसाचाही मोठा फटका सोलापूर, उस्मानाबाद, पुणे, सांगलीसह राज्याच्या इतर भागालाही बसला आहे. अतिवृष्टीने शेतक:यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतातील उभी पिकंही वाया गेली आहेत. या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी राज्य सरकार शेतक:यांचा पाठिशी खंबीरपणे उभे आहे. नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत. राज्य सरकार केंद्र सरकारकडे मदतीसाठी प्रस्ताव पाठवेल, पण केंद्र सरकारनेही त्यासाठी भरीव आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
  केंद्र सरकारने राज्याला भरीव मदत देण्याची आवश्यकता आहे. आतापर्यंतचा अनुभव पाहता केंद्राकडून तुटपुंजी मदतच केली गेली आहे. आता तर राज्य सरकारसमोर कोरोना संकटामुळे मोठ्या आर्थिक अडचणी आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करुन राज्याला जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी प्रयत्न करतील, असेही थोरात म्हणाले.
Back to top button