नवीदिल्ली/दि. ३ – द्वेषयुक्त भाषण प्रकरणाच्या वादानंतर फेसबुकने(FACEBOOK) तेलंगणाचे भाजप आमदार टी राजा सिंगवर(T RAJA SINGH) बंदी घातली आहे. फेसबुकने म्हटले आहे, की हिंसा आणि द्वेष पसरविण्याचे प्रयत्न केल्यामुळे ही कारवाई केली आहे. फेसबुक असे म्हटले आहे, की जे लोक आमच्या धोरणाच्या विरोधात जातात, त्यांची चौकशी केली जाते. चौकशीची व्याप्ती खूप मोठी असते. त्यामुळेच थोडा उशीर झाला, तरी आम्ही आमदारावर कारवाई केली आहे. राजा यांच्या फेसबुक तसेच इन्स्टाग्रामवरही(INSTAGRAM) बंदी घालण्यात आली आहे. अल्पसंख्यांकांविरोधात टिपणी केल्याप्रकरणी राजा यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात अमेरिकन वृत्तपत्र ‘वॉल स्ट्रीट जर्नल (THE WALL STREET JOURNAL)‘ने वृत्त दिले हो,ते की भारतातील फेसबुकचे अधिकारी भाजप नेते आणि त्यांच्याशी संबंधित गटांच्या नेत्यांना द्वेषयुक्त भाषण करूनही कारवाई करण्याचे टाळतात. त्यानंतर काँग्रेसने फेसबुक आणि भाजपमध्ये संबंध आहे, असा आरोप केला होता, तर भाजपनेही काही उदाहरणे देऊन फेसबुकचा काँग्रेसने कसा गैरवापर केला होता, असे प्रत्युत्तर दिले होते.
फेसबुकच्या अधिका-यांची चौकशी
फेसबुकचे अधिकारी संसदीय समितीसमोर हजर होते. त्यांची द्वेषयुक्त भाषणाच्या मुद्द्यावरून तेथे तीन तासांहून अधिक काळ चौकशी झाली. ‘जय श्री राम म्हणायचे जातीय आहे काय?‘. पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या वक्तव्यांबद्दल फेसबुकने किती तथ्य तपासले आणि सोनिया गांधी यांचे विधान किती वेळा तपासले गेले? काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांच्याशी फेसबुक अधिका-यांचे संबंध कसे? फेसबुकने २०१९ च्या निवडणुकीवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला का, अशा प्रश्न त्यांना चौकशीदरम्यान विचारण्यात आल्याचे सांगण्यात आले.