मराठी

शेतकरी बांधवांनी सोयाबीन बियाणे जतन करून ठेवावे

आगामी खरीप हंगामासाठी कृषी विभागाचे आवाहन

अमरावती, दि. १८ : आगामी खरीप हंगामासाठी सोयाबीन बियाणे जतन करून ठेवण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
कृषि विभागाच्या खरीप हंगाम 2021 नियोजनाबाबत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी नुकतीच कृषी विभागाची बैठक घेऊन आढावा घेतला. बियाणे, खते व इतर कृषि निविष्ठा नियोजन, मागणी अपेक्षित उपलब्धता व संभाव्य अडचणी याबाबत यावेळी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विजय चवाळे यांच्याशी चर्चा करण्यात आली.
अमरावती जिल्ह्यांचे खरीपाखालील प्रस्तावित क्षेत्र 7लाख 28 हजार 112 लक्ष हेक्टर असून सोयाबीन, कापुस, तूर ही प्रमुख पिके असून सोयाबीन 2 लाख 70 हजार हेक्टर, कापुस 2 लाख 61हजार हेक्टर व तुर 1 लाख 30 हजार हेक्टर आणि मुग, उडीद, ज्वारी व इतर पिकांचे 67 हजार 112 हेक्टर क्षेत्राचे नियोजन करण्यात आले आहे.
मागील हंगामात माहे सप्टें 2020 पासून सोयाबीन या पिकाचे स्वत:चे बियाणे स्वत: जतन करण्याबाबत जिल्ह्यात विस्तार यंत्रणेमार्फत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती मोहिम राबविण्यात आली असून त्यामध्ये शेतकऱ्यांनी 92620 क्विंटल सोयाबीन बियाणे जतन करुन ठेवलेले आहे.
एकूण 2.70 लक्ष हेक्टरससाठी 75 किलो प्रति हेक्टरप्रमाणे 2 लाख 15000 क्विंटल बियाणे पेरणीसाठी लागणार असून बियाणे बदलाचे प्रचलित प्रमाणानुसार 1 लाख 30 हजार क्विंटल सोयाबीन बियाण्याची मागणी करण्यात आलेली आहे. परंतु आता सोयाबीनचे दर वाढलेले असल्याने शेतकरी बांधव स्वत:कडील सोयाबीन विकून टाकण्याची शक्यता लक्षता घेता ज्या शेतकऱ्यांकडे मागील हंगामातील चांगले सोयाबीन उपलब्ध असेल त्यांनी वाढीव भावाला बळी न पडता स्वत:कडील सोयाबीनची उगवणक्षमता तपासून ते पेरणीसाठी राखुन ठेवणे आवश्यक आहे, असे आवाहन श्री. चवाळे यांनी केले आहे.
मागील हंगामात काढणीच्या वेळी व कापणीच्यावेळी आलेल्या पावसाने झालेले नुकसान लक्षात घेता मोठ्या प्रमाणात बिजोत्पादन कार्यक्रम बाधीत झाला असण्याची शक्यता आहे. तसेच आता सोयाबीनचे भावही वाढलेले असल्याने पुढे चांगल्या बियाण्याचे दर सुध्दा पर्यायाने वाढीव राहण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत स्वत:कडील चांगले सोयाबीन विकण्याऐवजी त्याची घरच्या घरी उगवणशक्ती तपासून ते पुढील हंगामात पेरणीसाठी वापरावे. ज्या शेतकऱ्यांकडे चांगल्या दर्जाचे सोयाबीन उपलब्ध आहे, त्यांनी त्यातून स्वत:ची व आपल्या परिचितांची सोयाबीन बियाणेची गरज भागविल्यास खर्चात बचत होण्याबरोबरच पुढे कमी प्रतिच्या बियाणेमुळे उद्भवणाऱ्या  तक्रारींचा मनस्तापसुध्दा टाळता येईल, असेही श्री. चवाळे यांनी स्पष्ट केले.
सोयाबीन हे स्वपराग सिंचित पिक असून त्यामध्ये कोणतेही संकरीत वाण विकसित झालेले नसल्याने या पिकांचे बियाणे दरवर्षी बाजारातून विकत घेऊन वापरण्याची अजिबात आवश्यकता नाही. बाजारातून खरेदी केलेल्या प्रमाणित बियाणेपासून तयार झालेले उत्पादन पुढे 2 वर्षापर्यंत बियाणे म्हणून वापरता येते. त्यामुळे जिल्ह्यात ज्या शेतकऱ्यांकडे चांगल्या सोयाबीनचा साठा आहे त्यांनी त्यातील प्रत्येक पोत्यातून मुठभर धान्य घेऊन त्यातून सरसकट 100 दाणे वेगळे करुन गोणपाटाच्या तुकड्यावर 10-10 च्या रांगेत लावून त्यावर दुसरा गोणपाटाचा तुकडा अंथरून चांगले पाणी मारून गुंडाळी करुन सावलीत ठेवावा. दररोज पाणी मारुन ओला ठेवावा. 7-8 दिवसात दाण्यांना चांगले कोंब येतील. गुंडाळी उघडून 100 दाण्यांपैकी चांगले निरोगी कोंब आलेल्या दाण्यांची संख्या मोजावी. ती 70 किंवा त्यापेक्षा जास्त आल्यास आपल्या सोयाबीनची उगवन शक्ती प्रमाणीत बियाण्याप्रमाणे आहे हे समजावे व ते शिफारशीप्रमाणे पेरणीसाठी वापरावे. जर उगवण 70 पेक्षा कमी येत असेल तर त्या प्रमाणात पेरणीसाठी बियाण्याची एकरी मात्रा वाढवून पेरणी करावी, अशी सूचना जिल्हा कृषी अधिक्षक अधिका-यांनी केली आहे.
सोयाबीन पिकाची पेरणी करतांना 4 ओळीनंतर एक ओळ रिकामी सोडून या ओळीत डवऱ्याच्या जानकुडाना दोरी गुंडाळून सरी पाडावी जेणे करुन मुलस्थानी जलसंधारणाबरोबरच सोयाबीन पिकातील पिक संरक्षाणाची कामे योग्य रितीने करता येईल व कमी बियाणे वापरुन सुध्दा चांगले उत्पादन घेतला येईैल. याप्रमाणे बिबिएफ यंत्राव्दारे गादी वाफयावर पेरणी करणे, सरी वरंब्यावर टोकण पध्दतीने पेरणी करणे, पटा पध्दतीने पेरणी करणे याव्दारे सुध्दा एकरी सोयाबीनचे 10 ते 12 किलो बियाणे कमी करता येऊ शकते. तसेच सोयाबीनमध्ये तुरीचे आंतरपिक घेतांना 8-9 ओळीनंतर तूर लावण्यापेक्षा 4-5 ओळीनंतर तुरीची ओळ पेरल्यास सोयाबीन व तुरीचे उत्पन्न सुध्दा चांगले घेता येऊ शकते व त्याव्दारे सुध्दा सोयाबीनच्या बियाणेची बचत करता येऊ शकते.
सोयाबीनवर बियाणे, खते, किटकनाशके व इतर निविष्ठांचा होणारा खर्च विचारात घेता सोयाबीन ऐवजी मुग, उडीद, चवळी, ज्वारी, तिळ या कमी खर्चाच्या पर्यायी पिकांचा अवलंब करणेसुध्दा फायदेशीर ठरु शकते. त्यादृष्टीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पुढील हंगामात स्व्त:कडील सोयाबीन उगवणक्षमता तपासून पेरणीसाठी वापरणे , बियाणे बचतीसाठी पट्टापेर पध्दत 4 ओळीनंतर रिकामी सरी सोडणे, बिबिएफ यंत्राव्दारे पेरणी, सरी वरंब्यावर टोकण पध्दतीने पेरणी, आंतरपिकाचे प्रमाण वाढविणे इत्यादी बाबींचा अवलंब करुन सोयाबीन बियाणेत बचत करुन तसेच सोयाबीनऐवजी मुग, उडीद, बरबटी, ज्वारी, तिळ या कमी खर्चाच्या पर्यायी पिकांची पेरणी करुन आपल्या खर्चात बचत करुन शाश्वत उत्पन्न मिळण्यासाठी नियोजन करावे.
सोयाबीन व इतर पिक पेरणीपूर्वी बियाणेला रासायनिक किंवा जैविक बुरशीनाशक व जिवाणु संघाची प्रक्रिया करुनच पेरणी करावी. 100 मी.मी. पाऊस झाल्यानंतर पेरणी करावी. सोयाबीन पेरणी 3-4 से.मी. पेक्षा जास्त खोलीवर केली जाणार नाही याची दक्षता घ्यावी. सोयाबीन, मुग, उडीद, तुर या शगवर्गिय पिकांमध्ये युरीयाचा वापर अत्यंत मर्त्यादीत करावा तसेच इतर पिकांमध्ये सुध्दा फुलोरा येण्याच्या कालावधीनंतर युरीयाचा वापर पुर्णत: टाळावा. महागड्या किटकनाशकांवर खर्च करण्यापेक्षा निंबोळ्या गोळा करुन त्याचा किड संरक्षणासाठी वापर करावा. व शेतीमध्ये होणाऱ्या अनावश्यक खर्चात्‍ कपात करुन शाश्वत उत्पन्नाचा मार्ग अवलंबावा, असे आवाहन अमरावती जिल्ह्यातील समस्त शेतकरी बंधु-भगिनींना  जिल्हाधिकारी यांच्यामार्फत करण्यात येत आहे.
कृषि विभागाच्या क्षेत्रीय यंत्रणेने हंगामापुर्वी प्रत्येक गावात शेतकऱ्यांना बांधावर जावून विविध माध्यमांच्या माध्यमातून कमी खर्चाच्या शाश्वत शेती तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत.

Related Articles

Back to top button