पावसाच्या अंदाजाने शेतकरी चिंतित
मुंबई/दि.१३ – बंगालच्या उपसागरात तयार झालेले तीव्र कमी दाबाचे क्षेत्र पुढील तीन दिवसांत महाराष्ट्रावरून सरकत १६ ऑक्टोबरच्या सकाळी अरबी समुद्रात प्रवेश करण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) वर्तवला आहे. या क्षेत्राच्या प्रभावामुळे पुढील चार दिवस महाराष्ट्रात सर्वदूर पावसाची शक्यता असून, काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज आहे. गेल्या काही दिवसांत परतीच्या पावसामुळे राज्यभरात कापणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले. आता पुन्हा चार दिवस मोठ्या पावसाचा अंदाज असल्यामुळे शेतकèयांच्या चिंतेत वाढ झाली आहे. हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या अतितीव्र कमी दाबाच्या क्षेत्राने मंगळवारी सकाळी आंध्र प्रदेशची किनारपट्टी ओलांडली. पुढील बारा तासांत पश्चिम- वायव्य दिशेला सरकताना डिप्रेशनची तीव्रता कमी होऊन त्याचे कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रावरून सरकत हे कमी दाबाचे क्षेत्र १६ तारखेच्या सकाळी उत्तर कोकण आणि गुजरात किनारपट्टीजवळ अरबी समुद्रात प्रवेश करेल. त्याच भागावर त्याची तीव्रता पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. कमी दाबाचे क्षेत्र महाराष्ट्रावरून सरकत असताना १४ तारखेला मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिवृष्टीची (२४ तासांत २०० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस) शक्यता आहे. त्याचप्रमाणे १७ तारखेपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सर्वदूर पावसाची शक्यता असून, काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. विदर्भात १५ तारखेपर्यंत अनेक ठिकाणी पाऊस अपेक्षित असून, त्यानंतर तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळतील.