मराठी

परीक्षातील त्रुटी शोधण्याचा फार्स

मुंबई/दि. १७ – विद्यापीठांच्या ऑनलाइन परीक्षांसंदर्भात मोठा गहजब झाल्यानंतर राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागास अखेर जाग आली आहे. मोठ्या टीकेचा सामना केल्यानतंर ऑनलाइन परीक्षांतील त्रुटींची चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे; परंतु त्यासाठी  नेमलेली समिती पाहिली, तर चाैकशीचा फार्स ठरण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे परीक्षेतील त्रुटी शोधण्यासाठी कुलगुरू, कुलसचिव आणि परीक्षा नियंत्रकांच समिती काम करणार असल्याने ही चौकशी फार्स ठरण्याचीच अधिक शक्यता आहे. कोरोना संसर्गामुळे विद्यापीठांच्या अंतिम सत्राच्या परीक्षा होऊ शकल्या नव्हत्या. केंद्र आणि राज्य यांच्या भांडणानंतर अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा घेण्याचा एकदाचा निर्णय झाला. त्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आल्या होत्या; मात्र ऑनलाइन परीक्षांत मोठ्या त्रुटी आढळून आल्या. त्याचा मनस्ताप लाखो परीक्षार्थींना झाला. त्यामुळे उच्च व तंत्रशिक्षण विभागाला मोठ्या रोषाचा सामना करावा लागला होता. झाल्या प्रकारानंतर या विभागाचे मंत्री उदय सामंत यांनी सर्व कुलगुरूंची दृरदश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली. त्या बैठकीत ऑनलाइन परीक्षांचा सामंत यांनी आढावा घेतला.
बैठकीत मंत्रिमहोदयांना परीक्षांतील त्रुटींचे कारण सापडले म्हणून त्याच्या शोधासाठी त्यांनी एक समिती नियुक्त करण्याचा निर्णय घेतला. याबाबतचा शासन निर्णय बुधवारी निघाला. या चौकशी समितीत सर्व अकृषक विद्यापीठाचे कुलगुरू, कुलसचिव, परीक्षा नियंत्रक आहेत. तसेच तंत्रशिक्षण व उच्च शिक्षणचे संचालकही सदस्य असून राज्याच्या माहिती तंत्रज्ञान महासंचालनालयाचे संचालक अध्यक्ष आहेत. एका महिन्यात समिती आपला अहवाल देणार आहे.
ऑनलाइन परीक्षांतील त्रुटीसाठी कुलगुरू, कुलसचिव आणि परीक्षा नियंत्रक यांच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे; मात्र त्यांनाच समितीत स्थान दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. कोरोनामुळे सामंत यांनी अंतिम वर्षाच्या परीक्षांना ठाम नकार दिला होता. केंद्र, राज्यपाल, अनुदान आयोग यांच्याशी वाद झाले. न्यायालयाच्या तंबीनंतर ते परीक्षा घेण्यास राजी झाले होते. अभियांत्रिकी पदवी प्राप्त उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत कोकणातील असून शिवसेनेचे नेते आहेत. लॉकडाऊन काळात परीक्षा घेण्यास विरोध करत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चांगलेच तोंडघशी पाडले होते.

Related Articles

Back to top button