मराठी

सभांदरम्यान दहशतवादी हल्ल्याची भीती

बिहार पोलिसांनी दिले अति दक्षतेचे आदेश

पाटणा/दि.२० –  राज्यातील निवडणुकीतील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचा वावर लक्षात घेता सभांदरम्यान दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिस मुख्यालयाने ‘हाय अलर्ट‘ जारी केला आहे. पोलिस मुख्यालयाने सर्व पोलिस महासंचालक, उपमहानिरीक्षक, सर्व जिल्ह्यांचे पोलिस अधीक्षकांना आदेश जारी केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक उच्च नेते बिहारमध्ये प्रचार करणार आहेत. त्यांच्या सुरक्षेबाबत सरकार आधीच गंभीर झाले आहे. विशेष बाब म्हणजे काही वर्षांपूर्वी पाटण्यातील गांधी मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवडणुकीच्या रॅलीदरम्यान स्फोट झाला होता. प्राप्त माहितीनुसार बिहार निवडणुकीदरम्यान अति महत्त्वाच्या व्यक्तींवर हल्ला होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी यासंदर्भात थेट माहिती देण्यास नकार दिला आहे; परंतु पोलिस मुख्यालयाच्या सूचनेनुसार सुरक्षा व्यवस्थेचा नव्याने आढावा घेण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक प्रचारासाठी बिहारमध्ये १२ रॅली काढणार आहेत. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी सहा सभा घेणार आहेत. २३ ऑक्टोबर रोजी दोघांची पहिली सभा आहे. गृहमंत्री अमित शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी या बिहारमध्ये येणा-या अतिमहत्त्वाच्या नेत्या आहेत. याशिवाय मुख्यमंत्री नितीशकुमार, उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी आणि विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांच्या जाहीर सभांमध्ये सुरक्षा अधिक कडक केली जात आहे. २०१४ च्या च्या लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान, मोदी यांच्या पाटणा येथील गांधी मैदानात झालेल्या झालेल्या रॅलीच्या जागेभोवती बॉम्बस्फोट घडले होते. त्यामुळे मोठी चेंगराचेंगरी झाली होती.

Related Articles

Back to top button