पवन व सौर ऊर्जेवर जगात भर
नवी दिल्ली दि १ – जगातील मोठ्या देशांमध्ये अक्षय ऊर्जेच्या स्त्रोतांविषयी बरेच काम केले आहे. प्रदूषणाच्या धोकादायक परिस्थितीवर मात करण्यासाठी हे प्रयत्न अतिशय प्रभावी मानले जातात. पवन आणि सौर ऊर्जामध्ये जर्मनी, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियाने लक्षणीय कामगिरी केली आहे.
पवन व सौर ऊर्जा निर्मितीतील वाढ ही जागतिक कोळशाच्या उत्पादनात सातत्याने कमी होण्यावरचा चांगला उपाय आहे. जगातील देश विशेषत: जीवाश्म इंधनापासून स्वत: ला दूर ठेवत आहेत.
2020 च्या पहिल्या सहामाहीत पवन व सौरऊर्जेपासून वीजनिर्मितीचा वाटा दहा टक्के राहिला आहे. हवामान बदलांवर काम करणारी थिंक टँक एजन्सी अंबरच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. वारा आणि सौर ऊर्जेच्या मदतीने भारत गरजेच्या दहा टक्के उत्पादन करीत आहे, तर अमेरिका 12 टक्के, चीन, जपान आणि ब्राझील 10 टक्के आणि तुर्कस्थान पवन व सौर ऊर्जामधून 13 टक्के वीज उत्पादन करीत आहे. युरोपीय संघ 21 टक्के व ब्रिटन वारा आणि सौर ऊर्जा यांच्या मदतीने 33 टक्के उत्पादन करीत आहे. भारतात हा बदल फार महत्वाचा आहे. आकडेवारी सांगते की भारतात पवन व सौर उर्जा उत्पादन 2014 मधील तीन टक्क्यांवरून 2020 मध्ये दहा टक्क्यांंपर्यंत वाढले आहे.
2015 मध्ये पॅरिस हवामान बदल करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर अनेक देशांनी सौर आणि पवन ऊर्जापासून वीजनिर्मितीचा वाटा दुप्पट केला आहे, तर भारताचा वाटा तिप्पट झाला आहे. चीन, जपान आणि ब्राझीलचा वाटा चार टक्क्यांंवरून दहा टक्क्यांंपर्यंत वाढला, तर अमेरिकेचा हिस्सा सहा टक्क्यांंवरून 12 टक्क्यांंपर्यंत वाढला. त्याच वेळी 2014- 2015 मध्ये सौर आणि पवन ऊर्जापासून वीज निर्मितीत भारताचा वाटा 4.4 टक्के होता, जो आता वाढून 10 झाला आहे. अहवालात म्हटले आहे, की भारतासह आशियाई देशांमध्ये कोळशाचे उत्पादन वाढत नाही. त्याच वेळी कोळशाच्या उत्पादनातील वाटा 77 टक्क्यांंवरून 68 टक्क्यांंपर्यंत घसरला.
चौकट
-
उत्सर्जन कमी केले नाही, तर दुष्परिणाम
वेगाने वाढणारे उत्सर्जन कमी केले नाही, तर त्याचे भयंकर परिणाम होऊ शकतात, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. आधीच पूर, दुष्काळ, वादळ, मॉन्सून बदल यांसारख्या आपत्तींमध्ये बरीच वाढ झाली आहे, त्याच बरोबर त्यांचे स्वरूपही विनाशकारी बनत चालले आहे.