मराठी

पाच माओवाद्यांना कंठस्नान

गडचिरोली दि १८: गडचिरोली जिल्ह्यातील कसनेलीच्या जंगलात झालेल्या चकमकीत पाच माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आले आहे. मृतांमध्ये तीन महिला आणि दोन पुरुष माओवाद्यांचा समावेश आहे.

कसनेलीच्या जंगलात सी सिक्स्टी कमांडो आणि माओवाद्यांमध्ये अजूनही चकमक सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. या वर्षातील माओवाद्यांच्या विरोधातली ही सर्वांत मोठी कारवाई असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. दुसरीकडे, तेलंगणा राज्यात झालेल्या चकमकीत दोन माओवादी ठार झाले. गेल्या काही दिवसांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यात माओवादी आणि जवानांमध्ये चकमक उडाली होती. यात दोन माओवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले होते. कारेची तालुक्यातील ग्यारापत्ती जंगलात 15 सप्टेंबर पहाटेच्या सुमारास ही चकमक उडाली होती.

नारेकसा जंगल परिसरात सी साठ पथकाचे जवान माओवादविरोधी अभियान राबवत असताना माओवाद्यांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. या भ्याड हल्ल्याला जवानांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले. जवानांनी माओवाद्यांचा कॅम्पदेखील उद्ध्वस्त केला. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा ताब्यात घेण्यात आला असून परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. एक पुरुष आणि एका महिला माओवाद्याचा मृतांमध्ये समावेश आहे. या चकमकीत पाच माओवादी जखमी झाले आहेत. घटनास्थळी माओवाद्याच्या दंडकारण्य झोनल समितीचा सदस्य भास्करदेखील या कॅपमध्ये उपस्थित होता, अशी माहिती समोर आली आहे. एक मे रोजी गडचिरोलीतील कुरखेडा तालुक्यातील जांभूरखेडा गावाजवळ येथे नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून आणला होता. त्यामध्ये 15 जवान हुतात्मा झाले होते. या घटनेचा सूत्रधार भास्करच होता.

दरम्यान, यापूर्वी सहा जुलै रोजी छत्तीसगडच्या धमतरी जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली होती. यामध्ये चार नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, मेचका पोलिस ठाणे क्षेत्रातील जंगलात ही चकमक झाली. यामध्ये एक पुरुष आणि तीन महिला नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले.

Related Articles

Back to top button