मराठी

उद्धव ठाकरे सरकारची डोकेदुखी वाढणार

मराठापाठोपाठ धनगर समाजही राज्यभर आंदोलन करणार

मुंबई/दि.२०– सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने ठाकरे सरकारविरोधात मराठा समाज आंदोलन करत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून सुप्रीम कोर्टात हे प्रकरण प्रलंबित आहे. मात्र कोर्टाने पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे मराठा आरक्षणाची सुनावणी सोपवताना शिक्षण आणि नोकऱ्यांमधील आरक्षणाला स्थगिती दिली. कोर्टाने निर्णयामुळे सरकारविरोधात मराठा समाजाने संताप व्यक्त केला. मराठा समाजाची बाजू कोर्टात ठामपणे मांडण्यास ठाकरे सरकार अपयशी ठरल्याचा आरोप केला जातो.
एकीकडे राज्यात मराठा समाज आरक्षणाच्या मागणीवर आंदोलन करत असताना आता दुसरीकडे धनगर समाजही एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे. धनगर समाजातील प्रमुख नेत्यांची शनिवारी बैठक पार पडली. या बैठकीत 21 सप्टेंबरपासून धनगर समाजाच्या मागण्यांसाठी राज्यभर आंदोलन उभारण्याचं निश्चित करण्यात आलं आहे.
याबाबत धनगर समाजाचे नेते प्रकाश शेंडगे म्हणाले की, धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित आहे, हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ठाकरे सरकारनं अध्यादेश काढून धनगरांना एसटीचं आरक्षण लागू करावं, या मागणीसाठी राज्यभरात आंदोलन करण्यात येईल. मेगाभरतीत मराठा समाजासाठी 13 टक्के जागा राखून ठेवून मेगाभरती ताबडतोब सुरु करावी. यासाठी 21 सप्टेंबरपासून राज्यभरात आंदोलन पुकारण्यात आलं आहे. प्रत्येक जिल्ह्यात, तालुका पातळीवर आंदोलन करण्यात येईल अशी माहिती शेंडगे यांनी दिली आहे.
तसेच या आंदोलनाची सुरुवात परभणीपासून होईल, येत्या आठवडाभरात आंदोलनाचा नियोजनबद्ध कार्यक्रम हाती घेण्यात येईल. धनगर समाजाच्या मागणीसाठी राज्यातील प्रमुख नेते एकत्रित आले होते. महाराष्ट्र शासनाने धनगर समाजाच्या शिष्टमंडळाशी चर्चा करुन या प्रश्नी तोडगा काढावा अशी मागणी करण्यात आली आहे. सरकारने जर अध्यादेश काढला नाही तर जनआंदोलन उभं करु, मराठा आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये ही आमची भूमिका आहे. मराठा आंदोलनात बहुजन समाजानेही साथ दिली होती. ओबीसी आरक्षणला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे असंही प्रकाश शेंडगे यांनी सांगितले आहे.

Related Articles

Back to top button