मराठी

त्या’ वाघिणीस वनविभागाने अखेर जिवंत पकडले

तातडीने उपाययोजना करण्याबाबत वनमंत्र्यांनी दिले होते निर्देश

यवतमाळ/दि. २३ – टिपेश्वर अभयारण्यालगत पांढरकवडा वनपरिक्षेत्रातील अंधारवाडी, वासरी, कोपामांडवी, कोब्बई परिसरात दहशत माजविणा-या ‘त्या’ नरभक्षक वाघिणीला जिवंत पकडण्यात वनविभागाला यश आले आहे. विशेष म्हणजे मानव – वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी तसेच या वाघिणीबाबत तातडीने उपाययोजना करण्यासाठी राज्याचे वनमंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड यांनी गावकरी व वन विभागाच्या अधिका-यांसोबत तातडीने बैठक घेतली होती. तसेच वन विभागाला याबाबत निर्देश दिले होते. सदर वाघिण वन विभागाच्या ताब्यात आल्यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
पांढरकवडा तालुक्यातील अंधारवाडी, कोपामांडवी, वासरी व कोब्बई या गावाजवळ वाघिणीचा गेल्या दोन महिन्यांपासून संचार असल्याने स्थानिक जनतेत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सदर वाघिणीकडून पशुधन हाणीच्य सहा घटना, एक व्यक्ती जखमी व एका महिलेचा मृत्यू झाल्याचे निदर्शनात आले होते. सदर वाघिणीबाबत उपाययोजना करण्यासाठी वनमंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेण्यात आली होती. वनमंत्र्यांच्या निर्देशानुसार प्रभावित क्षेत्रात गस्त करण्यासाठी आठ कर्मचाऱ्यांचे शीघ्र कृती  दल गठीत करण्यात आले. तसेच अमरावती येथील शीघ्र कृती दलास मोक्यावर नियुक्त करण्यात आले. याव्यतिरिक्त मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील विशेष व्याघ्र संरक्षण दलाचे आठ कर्मचारी, पांढरकवडा प्रादेशिक वनविभागातील पाच वनपरिक्षेत्र अधिकारी, 40 वनकर्मचारी, पेंच व मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील दोन पशुवैद्यकीय अधिकारी, प्रादेशिक व वन्यजीव विभागाचे इतर अधिकारी तसेच वनमजूर इत्यादी मार्फत वाघिणीचे संनियंत्रण करण्यात येत होते. तसेच सदर भागातील गावामध्ये वाघ जाऊ नये व अनुचित घटना घडू नये, यासाठी सात किलोमीटर चेनलिंक फेन्सींग लावण्यात आली होती
उपद्रवी वाघिणीची नेमकी ओळख पटविण्यासाठी प्रभावित क्षेत्रात 27 ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले. कॅमेरातील छायाचित्रे, वाघाच्या पाऊलखुणा इत्यादींचा अभ्यास करून वाघिणीची ओळख पटविण्यात आली. ओळख पटल्यानंतर तीला बेशुद्ध करून जेरबंद करण्यासाठी मुख्य वनसंरक्षक यवतमाळ यांच्याकडून प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नागपूर यांच्याकडे परवानगीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला. त्यांच्या परवानगीनंतर पेंच व्याघ्र प्रकल्पाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन पातोंड व मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अक्षय घटारे यांना उपवनसंरक्षक पांढरकवडा यांच्या मार्गदर्शनाखाली वाघिणीस जेरबंद करण्यास प्राधिकृत करण्यात आले. त्यांनी दिनांक 22 व 23 सप्टेंबर रोजी सतत वाघिणीच्या मागावर राहून दिनांक 23 सप्टेंबर रोजी सकाळी 10 च्या सुमारास उपद्रवी वाघिणीला अंधारवाडी शेतशिवार येथे बेशुद्ध करून जिवंत ताब्यात घेतले. यथोचित उपचारानंतर वाघिणीची रवानगी नागपूर येथील अस्थायी उपचार केंद्रात करण्यात आली आहे.
वाघीण जेरबंद करण्याची कार्यवाही यवतमाळ वनवृत्ताकडून पूर्ण करण्यात आली असून या कार्यवाहीत पांढरकवडा प्रादेशिक वनविभाग, पांढरकवडा वन्यजीव विभाग, अमरावती येथील शीघ्र बचाव दल, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे कर्मचारी, यवतमाळ जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक रमजाण विराणी यांनी सहभाग नोंदविला.

Related Articles

Back to top button