मराठी

माजी कृषिमंत्री अनिल बोंडे फास घेऊन धडकले बँकेच्या दालनात

कर्जासाठी शेतकऱ्यांना त्रास होत असल्याबद्दल आंदोलन

मंगेश तायडे/नांदगांव पेठ – शेतकऱ्यांना कर्जासाठी होत असलेला विलंब तसेच अतिरिक्त कागदपत्रांमुळे शेतकऱ्यांची होत असलेली फरफट यासाठी राज्याचे माजी कृषिमंत्री अनिल बोंडे आणि भाजप च्या जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी आज फास घेऊन बँकेच्या दालनात शिरले. शेतकऱ्यांना कर्ज मिळत नसल्याने त्यांच्यावर आत्महत्येची वेळ बँकांनी आणली आहे यापुढे शेतकऱ्यांना त्रास झाल्यास हा फास आता बँक अधिकाऱ्यांच्या गळ्यात टाकण्याचा इशारा अनिल बोंडे यांनी दिला आहे.
सोमवारी सकाळपासून भाजप च्या वतीने तालुक्यातील अनेक गावात जाऊन बँकेच्या विविध बँकेच्या दालनात हे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांना शेती कर्जासाठी बँकेच्या चकरा माराव्या लागत असून पेरणीचे दिवस संपले तरी काही शेतकऱ्यांना कर्ज प्राप्त झाले नाही.अत्यावश्यक कागदपत्रांच्या नावावर शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यात येत असून कमीत कमी कागदपत्रांवर शेतकऱ्यांना कर्ज देण्यात यावे अन्यथा यापुढे शेतकऱ्यांच्या गळ्यातील फास आता बँक अधिकाऱ्यांच्या गळ्यात टाकण्यात येईल असा इशारा अनिल बोंडे यांनी बँक अधिकाऱ्यांना दिला आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक, सेंट्रल बँक या तिनही बँकांमध्ये भाजप च्या वतीने अधिकाऱ्यांना इशारा देऊन शेतकऱ्यांना सौजन्याने वागणूक देण्यासाठी दम भरण्यात आला.यानंतर माहुली जहागीर, यावली शहीद याठिकाणी सुद्धा भाजप च्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी सर्व ठिकाणचे भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
  • मुख्य कार्यकर्त्यांनी फिरविली पाठ
आज भाजप च्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनाला भाजपच्या मुख्य कार्यकर्त्यांनी पाठ फिरवली.भाजप मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून कार्यकर्त्यांची धुसफूस सुरू असून जुन्या कार्यकर्त्यांचा सन्मान होत नसल्याने आयोजकांनी चांगलीच फजिती झाली होती.तर माहुली जहागीर येथील आंदोलनात चक्क लोकप्रतिनिधींनाच बोलावण्यात न आल्याने कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधींनी  नेत्यांबद्दल नाराजी व्यक्त केली.

Related Articles

Back to top button