कोरोना संक्रमितावर अंत्यसंस्कार करणार्यांना मिळणार ५० लाखाचे विमा कवच
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली घोषणा
कोल्हापूर/दि.१६– बैत्तुल माल कमिटीने विविध जाती धर्माच्या 55 कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत. त्याबद्दल या समितीला सलाम करुया. त्यांच्यासह कोरोना मृतदेहांवर शहरी क्षेत्रात अंत्यसंस्कार करणाऱ्यांसाठी 50 लाखाचे विमा कवच मिळावे, यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगतानाच ग्रामीण भागासाठी 50 लाखाचे विमा कवच दिले जाईल, अशी घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे.
राज्यातील सर्व नागरिकांना अर्सेनिक अल्बम-30 आणि संशमनी वटी औषधांचे वाटप करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला असून त्याचा शुभारंभ येथील शासकीय विश्रामगृहातील राजर्षी शाहू सभागृहात ग्रामविकास मंत्र्यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री सतेज पाटील होते. यावेळी ग्रामविकास मंत्री मुश्रीफ म्हणाले, राज्यातील नागरिकांची प्रतिकारशक्ती वाढविण्याच्या दृष्टिने हा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये मालेगावच्या युनानी काड्याचा यात समावेश करण्यात आला आहे. ग्रामसेवक,आशा, अंगणवाडी सेविका या सर्वांना सप्टेंबरपर्यंत 50 लाखाचे विमा कवच लागू करण्यात आले आहे.
याचबरोबर, तपासण्या वाढल्यामुळे रुग्ण संख्या वाढत आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही संख्या आणखी वाढणार आहे. राज्यात अनुभव नसतानाही मुख्यमंत्री चांगले काम करत आहेत. जिल्ह्यात पालकमंत्री बंटी पाटील यांचेही अतिशय उत्कृष्ट काम सुरु आहे. ही वेळ टीका-टिप्पणी, आंदोलन करण्याची नसून सर्वांनी एकत्र येऊन आलेल्या संकटावर मात करण्याची आहे, असे उदगार ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांनी काढले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, उपाध्यक्ष सतीश पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, महिला व बाल विकास समिती सभापती पद्माराणी पाटील, समाजकल्याण सभापती स्वाती सासणे, शिक्षण सभापती प्रविण यादव, बांधकाम सभापती हंबीरराव पाटील उपस्थित होते.