अमरावती/दि. 28 – जिल्ह्यात कोरोना विषाणूचे संक्रमण वाढत असताना प्रत्येकाने आपली तसेच कुटूंबियांची काळजी अत्यंत आवश्यक झाले आहे. ताप, घसादुखी, अंगदुखी, अशक्तपणा, श्वास घेण्यास अडचण, जिभेची चव जाणे किंवा कुठलाही शारिरीक त्रास आदी लक्षणे दिसल्यास सरकारी अथवा खासगी रुग्णालयात जाऊन तत्काळ तपासणी करावी. कोरोना संबंधीची आरटीपीसीआर चाचणी करुन घेऊन स्वत:सह कुटुंबाला व समाजाला संक्रमणापासून वाचवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी श्री. नवाल यांनी नुकतीच बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांच्यासह आरोग्य यंत्रणेचे प्रमुख, इंडियन मेडिकल असोसिएशन, खासगी डॉक्टर्स, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर आदी यावेळी उपस्थित होते.
श्री. नवाल म्हणाले की, जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढीचा आलेख दिवसागणिक वाढत आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने कोरोना त्रिसुत्रीचे काटेकोर पालन करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभाग कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसह रुग्णांना तत्काळ आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. नागरिकांनीही प्रशासनाच्या या प्रयत्नांना सहकार्य करीत कोविड अॅप्रोप्रियेट बियेव्हीएअर अंगीकारावे. विनाकारण घराबाहेर पडू नये.
जिल्हा प्रशासनाव्दारे जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात लसीकरण केंद्रे सुरु केली आहेत. लस पूर्णत:सुरक्षित असून नागरीकांनी लसीकरण केंद्रावर जाऊन स्वत:चे व कुटुंबियांचे लसीकरण करुन घ्यावे. कोरोनाला हरविण्यासाठी प्रत्येकानेच जबाबदारीने वागणे आता गरजेचे आहे. ताप, सर्दी, खोकला, श्वास घेण्यास अडचण, घसादुखी, अंगदुखी, जिभेची चव जाणे आदी लक्षणे दिसल्यास त्यावर घरगुती इलाज करण्यापेक्षा तत्काळ रुग्णालयात जाऊन औषधोपचार करावे. स्वत:सह इतरांना सुरक्षित ठेवण्यासाठी कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी करावी.
कोरोनाला हरविण्यासाठी जिल्ह्यातील सगळ्या खासगी डॉक्टर्स, शासकीय रुग्णालये, आरोग्य संस्था आदींनी प्रशासनाच्या या मोहिमेत सहकार्य करावे. आपणाकडे रुग्ण तपासणीसाठी आल्यास कोरोना आजाराचे गांभीर्य त्यांच्या लक्षात आणून द्यावे. त्यांचे व्यवस्थित समुपदेशन व औषधोपचार करा, असे आवाहनही त्यांनी वैद्यकीय यंत्रणांना केले.
केंद्र व राज्य शासनांच्या कोरोनासंबंधीच्या सूचनांने वेळोवेळी पालन करा. एकमेकांचे मनोबल वाढवून कोरोनाला हरविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केल्यास आपण कोरोना विरुध्दची लढाई नक्की जिंकू, असेही त्यांनी सांगितले.