योग्य उपचारासोबतच रुग्णांना मानसिक उभारी द्या
सुपर स्पेशालिटीचे कोव्हीड वॉर्ड रुग्णसेवेसाठी कार्यान्वित
यवतमाळ/दि. २० -: कोणताही रुग्ण जेव्हा उपचारासाठी रुग्णालयात दाखल होतो, तेव्हा त्याच्या मनाची स्थिती अत्यंत खालावलेली असते. कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाने तर नागरिकांच्या मानसिकतेवरच कब्जा केल्याचे चित्र आहे. त्यामुळे येथे दाखल होणा-या कोरोनाबाधित रुग्णांना योग्य उपचार देऊन त्यांना मानसिक उभारी देण्याचे काम डॉक्टरांनी करावे, असे आवाहन वनमंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.
वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या कोव्हीड वॉर्डचे उद्घाटन करतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. आर.पी.सिंह, कोरोना नियंत्रण समन्वयक डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, डॉ. बाबा येलके, डॉ. गिरीश जतकर, डॉ. सुरेंद्र भुयार आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सुपर स्पेशालिटीच्या दोन माळ्यांवर तातडीने कोव्हीड वॉर्ड तातडीने सुरु करण्याचा सुचना दिल्या होत्या, असे सांगून पालकमंत्री श्री. राठोड म्हणाले, इमारतीचे बांधकाम आणि कोव्हीड वॉर्डातील आधुनिक सोयीसुविधा पाहून येथे उपचार घेणा-या रुग्णांना नक्कीच फ्रेश वाटणार आहे. आजार कितीही गंभीर असू द्या, रुग्णाची मानसिक स्थिती चांगली असली तर सदर रुग्ण लवकर बरे होण्यास मदत होते. बरे होण्यासाठी योग्य उपचार व औषधांऐवढेच प्रसन्न मनही आवश्यक आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थतीत रुग्णाला मनातून खचू देऊ नका. प्रत्येक रुग्णाचा जीव आपल्यासाठी महत्वाचा आहे.
गत सहा महिन्यांपासून वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉक्टर्स तसेच जिल्ह्यातील संपूर्ण आरोग्य यंत्रणा प्रयत्नांची पराकाष्ठा करून रुग्णसेवा करीत आहेत. यापुढेही त्यांच्याकडून चांगल्या कामाची अपेक्षा आहे. नवीन कोव्हीड वॉर्डातील नैसर्गिक प्रकाश व्यवस्था, लाईट – फॅन व्यवस्था अतिशय चांगली आहे. आवश्यक डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉय आणि सफाई कर्मचारी व इतर स्टाफही येथे त्वरीत उपलब्ध करा, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. यावेळी दोन्ही माळ्यावरील कोव्हीड वॉर्डात उभारण्यात आलेल्या सोयीसुविधा व वॉशरुमची त्यांनी पाहणी केली.
सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये दोन माळ्यावर तयार करण्यात आलेल्या कोव्हीड वॉर्डात एकूण 160 ऑक्सीजनयुक्त बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त आणखी बेडची व्यवस्था करण्याचे काम प्रगतीपथावर असून तेसुध्दा लवकरच कार्यान्वित होतील. सद्यस्थितीत येथे 20 व्हेंटीलेटरची व्यवस्था आहे.
यावेळी डॉ. अमोल देशपांडे, पराग पिंगळे, राजेंद्र गायकवाड, यशवंत पवार, विकास क्षीरसागर, नर्सेस स्टाफमधील प्रभा चिंचोळकर, वनमाला राऊत, वंदना उईके, माया माघाडे आदी उपस्थित होते.