किंमती घसरल्याने सोने खरेदीत वाढ
मुंबई/दि.१९ – ऑगस्टमध्ये सोन्याने प्रति तोळा 57 हजार रुपयांची पातळी गाठली होती. सध्या 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रतितोळा 49 हजार रुपयांच्या जवळ आहे. सोन्याच्या किंमतीत घट झाल्याने सोन्याच्या दागिन्यांची मागणी डिसेंबरच्या तुलनेत दहा-वीस टक्क्यांनी वाढली. यावर्षी एप्रिल, मे आणि जूनमध्ये विवाहसोहळ्याचे बरेच मुहूर्त आहेत. या व्यतिरिक्त, कोरोना महामारीमुळे 2020 मध्ये होऊ शकले नाहीत, असे अनेक विवाह 2021 मध्ये होणार आहेत. सहाजिकच दागिन्यांची मागणीही वाढली आहे. डिसेंबरमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रतितोळा 50 हजार रुपये होती. ती आता 48 हजार नऊशे रुपयांच्या जवळपास आहे. त्याचवेळी दागिने तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रतितोळा 47 हजार नऊशे रुपये आहे. कोरोनाचे लसीकरण सुरू झाल्याने गेल्या दहा दिवसांत लोकांची भीती कमी झाली आहे. त्यामुळे आता लोक दुकानात जाऊन लग्नासाठी दागिने खरेदी करीत आहेत. त्याशिवाय किंमती खाली आल्यामुळे सोन्याचा वापरही वाढला आहे. 2020 ऑगस्टमध्ये कोरोना साथीचा प्रादुर्भाव, अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीविषयी अनिश्चिततेमुळे सोन्याचे भाव वाढले होते. अमेरिका आणि चीनमधील संबंधातही तणाव आला होता. त्यामुळे सोने प्रतितोळा 57 हजार रुपयांच्या पातळीवर पोहचले होते; पण आता पुन्हा सोने 50 हजाराच्या आत आहे. ऑगस्टपासून सोन्याच्या किंमतीत 16.5 टक्के इतकी घट झाली आहे. मुंबईतील ज्वेलर्स म्हणतात की, दिवाळीपासून सोन्याच्या दागिन्यांची मागणी पुन्हा वाढू लागली आहे. जानेवारीत लग्नाच्या हंगामातही मागणी वाढली आहे आणि लग्नाचा हंगाम पुढे गेल्यामुळे मागणी वाढण्याची अपेक्षा आहे. ज्वेलर्सच्या म्हणण्यानुसार, आता महानगरांमध्येही सोन्याची मागणी वाढत आहे कारण या भागातील लोकांचे जीवन सामान्य स्थितीत येत आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा सोन्याची आयात करणारा देश आहे. ज्वेलरी उद्योगाला सोन्याची सर्वाधिक मागणी आहे. देशात वर्षभरात साधारणपणे 800 ते 900 टन सोन्याची आयात होते.