पुणे दि २८ – करोनावरील लस केव्हा येणार, याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागलेले असताना पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी आज पुणे येथे येऊन सीरम इन्स्टिट्युटला भेट दिली व लस निर्मिती व उत्पादनाबाबतची सद्यस्थिती जाणून घेतली. पंतप्रधान सुमारे एक तास सीरममध्ये होते. पंतप्रधानांच्या या भेटीनंतर करोना लसीबाबत लवकरच शुभवार्ता मिळण्याची आशा वाढली आहे. करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचं संकट देशावर घोंगावू लागलं असतानाच ही लाट रोखायची असेल तर करोनावरील लस हाती येणं अत्यंत आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेगवान पावले टाकायला सुरुवात केली आहेत. पंतप्रधानांनी आज एकाच दिवशी अहमदाबाद, हैदराबाद आणि पुणे या तीन शहरांचा दौरा करत संबधित संस्था व कंपनीना भेट देत लस उत्पादनाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला.
पंतप्रधान मोदी यांनी आज सर्वप्रथम सकाळी अहमदाबाद येथील झायडस बायोटेकला भेट दिली. तिथे आढावा घेतल्यानंतर ते हैदराबाद येथील भारत बायोटेकमध्ये पोहचले. या ठिकाणी सुरू असलेली लस निर्मिती आणि त्याचे उत्पादन याबाबत संबधित शास्त्रज्ञांकडून माहिती घेतल्यानंतर पंतप्रधानांनी या सर्वांच्याच प्रयत्नांचं कौतुक केलं. हैदराबादनंतर पंतप्रधान थेट पुण्यात दाखल झाले. पुणे विमानतळावरून पंतप्रधानांनी हेलिकॉप्टरने सीरम इन्स्टिट्युट गाठली. तिथे पूनावाला कुटुंबीयांनी पंतप्रधानांचं स्वागत केलं. यावेळी सीरमचे सायरस पूनावाला आणि अदर पूनावाला यांनी पंतप्रधानांना लस उत्पादनाबाबत तपशीलवार माहिती दिली. त्यानंतर सीरमच्या शास्त्रज्ञांशीही पंतप्रधानांनी चर्चा केली. या बैठकीनंतर लसचं उत्पादन जिथे सुरू आहे त्या लॅबलाही पंतप्रधानांनी भेट घेतली. सुमारे तासभर पंतप्रधान सीरम इन्स्टिट्युटमध्ये होते.
दरम्यान, ‘सीरम इन्स्टिट्युट’मध्ये अॅस्ट्राझेनेका कंपनी आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या लसीचे उत्पादन घेण्यात येत आहे. पंतप्रधान मोदी यांनी या लसीचे वितरण करण्याबाबत बैठका घेतल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधानांनी सीरमला भेट दिली. लसनिर्मिती, साठवणुकीची तयारी आणि नागरिकांपर्यंत लस कशी नेता येईल, यावर त्यांनी शास्त्रज्ञांशी चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे.