मराठी
गुगलकडून संजय निकस पाटील यांना 3,63,791 रुपये देवून सन्मान
यशाचे श्रेय राज्यातील पत्रकार बांधवांना
अमरावती दी ६ -संपूर्ण जगातील सर्वात मोठ्या इंटरनेट प्रणालीचे संचालन करणा:या गुगलकडून पत्रकार संजय निकस पाटील यांना गूगल न्यूज इनिशिएटिव्ह कडून पाच हजार डॉलर (3,63,791 रुपये) देऊन सन्मानीत करण्यात आले आहे. त्यांची अकोला, अमरावती व बुलडाणा जिल्ह्यातील पत्रकारिता क्षेत्रातील कामगीरी व समाजिक योगदानाची दखल घेऊन हा सन्मान करण्यात आला आहे. कोरोना वातावरण असल्याने त्यांना हा सन्मान ऑनलाईन मिळाला आहे. गत सहा महिन्यांपासून सुरु असलेली ही प्रक्रिया शनिवार दिनांक 5 सप्टेंबरला शिक्षक दिनी पूर्ण झाली. या सन्मानासाठी जगभरातील सर्व देशांमधून गुगलने अर्ज बोलाविले होते. यामध्ये भारतासह 140 देशातील लाखो पत्रकारांनी अर्ज केले होते. त्यामधून 140 देशांमधून फक्त 1200 पत्रकारांना हा सन्मान व मदत मिळाली आहे. भारतामधून काही ठराविक पत्रकारांचाच यामध्ये समावेश आहे. कोरोना काळात अनेक पत्रकारांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. पत्रकारिता क्षेत्रात बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. अशा अनेक अडचणींचा सामना पत्रकारांना करावा लागत आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन गुगलने लघुु वृत्तपत्रांच्या पत्रकारांना जागतीक पातळीवर पत्रकारिता करण्यासाठी प्रोत्साहान, सन्मान व पुरस्कार देण्याचे गत मार्च महिन्यात ठरविले होते. त्या प्रक्रियेत निकस पाटील यांनी सहभाग घेऊन यश प्राप्त केले आहे. गुगलकडून करण्यात आलेल्या विविध चाचणींमध्ये, परिक्षांमध्ये निकस पाटील यांनी शेवटपर्यंत बाजी मारली व टिकून राहून हे ऐतिहासिक यश प्राप्त केले आहे. यावेळी गुगलकडून शिक्षण, कार्य, योगदान आणि पत्रकारितेतील नाविन्यूपर्ण उपक्रम या सर्व गोष्टींची एकप्रकारे परिक्षेच्या स्वरुपात तपासणी करण्यात आली. जगातील नामांकित टॉप टेन वृत्तपत्रांचे प्रतिनिधी, गुगलची तज्ञ टीम यांनी ही सर्व चाळणी प्रक्रिया पूर्ण केली. या चाळणी प्रक्रियेत यशस्वी गुणांकन मिळवत संजय निकस पाटील यांनी गुगल न्यूजच्या सर्वोच्च दरबारात भारत देशातून स्थान मिळविले आहे. त्यामुळे देशभरातील त्यांच्या चाहत्यांकडून, पत्रकारांकडून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.
जगभरातील पत्रकारिता क्षेत्रात आगामी वर्षात गुगल क्रांतीकारी पाऊल उचणार आहे. आणि या क्रांतिकारी वाटचालीत संजय निकस पाटील यांचाही भारत देशातून समावेश होणार आहे, अशीही माहिती आहे. लवकरच ही सर्व प्रक्रिया जाहीर होणार आहे. त्यामुळे विदर्भात संजय निकस पाटील यांच्या मार्फत अनेक पत्रकारांना आपल्या पत्रकारितेचे विश्व जागतीक पातळीवर पोहोचविण्यास मदत होणार, अशी आशा आहे. फॉरेन करन्सी प्रकिया पूर्ण होऊन संजय निकस पाटील यांना गुगलने पाच हजार डॉलर (3,63,791 रुपये) सुपूर्द केले आहेत. यापूर्वीही निकस पाटील यांनी महाराष्ट्र शासनाचे विविध पुरस्कार मिळालेले आहेत. या सर्व प्रक्रियेत सहकारी भागवत मुठ्ठे यांचे मोठे योगदान लाभल्याचे निकस यांनी नमूद केले आहे. निकस पाटील यांनी या सर्व यशाचे श्रेय राज्यभरातील सर्व पत्रकारांना दिले आहे.