डीपीच्या स्फोटात जखमी झालेल्या आजी-नातीचा मृत्यू
पुणे : भोसरी येथे काल दुपारी महावितरणच्या डीपीत झालेल्या स्फोटात गंभीर जखमी झालेल्या आजी आणि नातीचा आज दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर या स्फोटात जखमी झालेल्या चिमुकलीच्या आईची प्रकृती गंभीर असून तिच्यावर ससूनमध्ये उपचार सुरू आहेत.
काल दुपारी दीडच्या सुमारास भोसरीच्या इंद्रायनीनगरमध्ये ही दुर्देवी घटना घडली. शारदा दिलीप कोतवाल (वय ५०), अक्षदा सचिन काकडे (वय ३२), शिवन्या सचिन काकडे (वय ५ महिने) या तिघी या स्फोटात गंभीर जखमी झाल्या. डीपीला लागून असलेल्या घरात डीपीतील ऑईल उडाले. त्यावेळी अक्षदा त्यांची मुलगी शिवन्या हिला आंघोळ घालत होत्या. त्यांची आई शारदा देखील तेथेच होत्या. शारदा, अक्षदा व चिमुकल्या शिवन्या यांच्या अंगावर डीपीतील हे ऑईल उडून त्या तिघी गंभीर भाजल्या. स्फोटामुळे या परिसरात आग लागल्याने या तिघींना रुग्णालयात नेण्यास विलंब झाला; मात्र रुग्णालयात दाखल केल्यानंतर या तिघींवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. उपचार सुरू असतानाच २३ तासानंतर शारदा कोतवाल आणि शिवन्या यांची प्राणज्योत मालवली, तर अक्षदा यांची प्रकृती अजूनही गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, राज्याचे ऊर्जामंत्री डाॅ नितीन राऊत यांनी या प्रकरणी चाैकशी करण्याचे आदेश दिले आहेत