अर्थव्यवस्थेतील वाढ मंदीतून बाहेर काढणार
मुंबई/दि.२९ – भारतीय अर्थव्यवस्थेने गेल्या सप्टेंबर महिन्यापासून वेग पकडला आहे. मागणीत आलेल्या तेजीमुळे व्यावसायिक हालचालींत वाढ झाली आहे आणि त्यामुळे देशाला कोरोनामुळे निर्माण झालेल्या मंदीतून बाहेर पडण्यास मदत मिळेल.
ब्लूमबर्गद्वारे ट्रॅक केलेल्या आठ हाय फ्रिक्वेन्सी इंडिकेटर्सपैकी पाचमध्ये गेल्या महिन्यात सुधारणा दिसत आहे, तर तीन इंडिकेटर स्थिर आहेत. यामुळे आर्थिक संकटावेळी लोकांच्या वित्तीय निर्णयांचे मापन करणाऱ्या तथाकथित “अॅनिमल स्पिरिट’ डायलवर सुईनेही गती पकडली आहे आणि ही ४ वरून ५ वर पोहोचली आहे. मार्चमध्ये लावलेल्या कठोर टाळेबंदीनंतर लोक पुन्हा खरेदी करत आहेत. सप्टेंबरमध्ये निर्यातीत सहा टक्के वृद्धी झाली. कृषी उत्पन्न आणि फार्माशिवाय अभियांत्रिकी वस्तू आणि रसायनांतील सुधारणेमुळे मदत मिळाली आहे. या दरम्यान व्यापार तुटीचे अंतरही कमी झाले. निर्मिती पीएमआय ५६.८ वर पोहोचला आहे. हा जानेवारीनंतर सर्वाधिक उंचीवर आहे. आयएचएस मार्केटनुसार, वर्क ऑर्डरमध्ये वाढ हे या मागचे कारण आहे.
भारताच्या सेवा क्षेत्रातील उलाढालही वाढत आहेत. ऑगस्टमधील ४१.८ च्या तुलनेत सप्टेंबरमध्ये ती ४९.८ टक्क्यांवर पोहोचली. एप्रिलमध्ये या क्षेत्राचा निर्देशांक विक्रमी नीचांकी ५.४ पातळीवर होता. पायाभूत सुविधा उद्योगांतील उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत ऑगस्ट २०२० मध्ये साडेआठ टक्के कमी राहिले आणि हे जुलैमधील आठ टक्क्यांच्या तुलनेत थोडा खराब राहिला. यात एप्रिलमध्ये विक्रमी ३७.९ टक्क्यांची घसरण नोंदली. ऑगस्टमध्ये औद्योगिक उत्पादन ८ टक्के घसरले. हे जुलैच्या घसरणीपेक्षा कमी आहे. भांडवली वस्तूचे उत्पादन १५.८ टक्के घसरले. हे महिनाभरापूर्वीच्या २२.८% घसरणीपेक्षा कमी आहे.
कर्जात वाढ
रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये कर्ज मागणीत ५.२ टक्के राहिली. गेल्या महिन्यातील साडेपाच टक्क्यांच्या तुलनेत कमी व गेल्या वर्षीच्या वृद्धीदरापेक्ष निम्मी राहिली. मागणीचे एक प्रमुख संकेतक प्रवासी वाहनाची विक्री गेल्या वर्षाच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये २६.५ टक्के वाढली आहे. किरकोळ विक्रीनेही स्थिरतेचे संकेत दिले आहेत.