मराठी
पालकमंत्र्यांकडून तिवसा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी
-
पुनवर्सनाच्या कामांना गती देणार
-
पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर
अमरावती, दि. १ : पूर येऊन बाधित होणाऱ्या परिसराचे पुनर्वसन होण्याच्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही गतीने करण्यात येईल, असे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज तिवसा तालुक्यातील शिंदवाडी येथे सांगितले.
पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी आज तिवसा तालुक्यातील नमस्कारी, शिंदवाडी, कौडण्यपूर, दुर्गवाडा आदी गावांना भेट देऊन पाहणी केली. जि. प. सभापती पूजाताई आमले, पं स सभापती शिल्पाताई हांडे, तिवसा येथील नगराध्यक्ष वैभव वानखेडे व विविध मान्यवर, अधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.
पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, बाधित परिसरातील पुनर्वसनासाठी प्रयत्न करण्यात येतील. नागरिकांना सर्व सुविधा मिळवून देण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
नुकसानग्रस्त भागातील नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी तत्काळ पाहणी व पंचनामे करावे. त्याचप्रमाणे, नादुरुस्त रस्त्यांची तात्काळ सुधारणा करावी. नमस्कारी या गावाचा संपर्क तुटू नये, म्हणून रस्ते दुरुस्तीसह पूल उभारण्यासाठी पावले उचलावीत, असे निर्देश त्यांनी दिले.
तालुक्यात पांदणरस्त्यांची कामे प्राधान्याने राबविण्यात येतील. त्यादृष्टीने कामांची आवश्यकता व लक्षात घेऊन प्रशासनाने नियोजन करावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.