महावीर जयंती व हनुमान जयंती उत्सव साजरा करण्याबाबत मार्गदर्शक सूचना
अपर जिल्हा दंडाधिका-यांकडून परिपत्रक जारी
अमरावती, दि. 22 : कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर महावीर जयंती उत्सव, तसेच हनुमान जयंती उत्सव साजरा करण्याबाबत शासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार सर्वांनी शिस्त, संयम पाळून घरीच राहून उत्सव साजरा करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
शासनाच्या मार्गदर्शक सूचनांबाबत परिपत्रक अपर जिल्हा दंडाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी जारी केले आहे.
महावीर जयंती 25 एप्रिल रोजी असून, हा उत्सव संपूर्ण महाराष्ट्र राज्यात जैन बांधव मोठ्या प्रमाणात व उत्साहाने साजरा करतात. मात्र, सध्याची कोरोना साथ लक्षात घेता लोकांनी एकत्र न येता साधेपणाने आपापल्या घरी राहून उत्सव साजरा करावा. सर्व धार्मिक स्थळे बंद असल्याने पूजाअर्चा व दर्शनासाठी जाता येणार नाही. मंदिर व्यवस्थापकांनी शक्य असल्यास दर्शनाची समाजमाध्यमांवर ऑनलाईन सुविधा द्यावी. कोणतीही प्रभात फेरी, मिरवणूका काढू नयेत, असे मार्गदर्शक सूचनांत नमूद आहे.
हनुमान जयंती उत्सव 27 एप्रिल रोजी साजरा करण्यात येणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी एकत्र न येता घरीच राहून उत्सव साजरा करावा. कोणतीही प्रभातफेरी व मिरवणूका काढू नयेत. धार्मिक स्थळे बंद असल्याने भजन, कीर्तन, पठण आदी किंवा कुठल्याही कार्यक्रमांचे आयोजन करू नये. मंदिर व्यवस्थापकांनी शक्य असल्यास समाजमाध्यमांद्वारे ऑनलाईन दर्शनाची सुविधा द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.