अमरावती दी/३- प्रेमाच्या आणाभाका देऊन त्याने तिचे सर्वस्व लुटले, जबरीने गर्भपात देखील करविला. तो तेवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने चक्क दोनदा नोंदणी विवाहाकडे पाठ फिरविली. प्रेम, लगट, गर्भपात अन् कोर्ट मॅरेजला दांडी! असा काहीसा हा प्रकार वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला. याप्रकरणी वलगाव पोलिसांनी आरोपी सत्यजित उर्फ आनंद सुभाषराव उगले (२४, वलगाव) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला.
तक्रारीनुसार, १५ मे २०१५ ते ८ जानेवारी २०२१ या कालावधीत त्या तरुणीची घोर फसवणूक करण्यात आली. आरोपी व पीडिताचे सन २०१५ पासून प्रेमसंबंध होते. त्यादरम्यान आरोपीने वलगाव रेल्वे स्टेशन भागात तिचेवर अतिप्रसंग केला. त्यानंतर बदनामीची धमकी देत त्याने वारंवार पीडिताशी शारीरिक लगट केली. त्यामुळे जानेवारी महिन्यात ती गर्भवती राहिली. तरुणीने त्याच्याजवळ लग्नाचा हेका धरला. मात्र, नानाविध कारणे सांगून त्याने लग्न करणे शक्य नाही, असे बजावले. आपण नंतर लग्न करू, मात्र, गर्भवती असल्याचे माहिती झाली तर, बदनामी होईल, असे सांगून त्याने तिला चार गोळ्या दिल्या. त्यामुळे पीडिताचा गर्भपात झाला.
असा कसा रे तू सत्यजित!
तुझ्या प्रेमात असल्याने मी गर्भपातदेखील सहन केला. आता तरी लग्न कर ना, असा कसा रे तू सत्यजित, अशी भावना पीडिताने त्याच्याजवळ बोलून दाखविली. ५ नोव्हेंबर रोजी तिने लग्न करण्यासाठी त्याच्याकडे आग्रह धरला. तो तयारदेखील झाला. त्यानुसार २७ नोव्हेंबर रोजी दोघांचा साखरपुडा देखील झाला. ३० नोव्हेंबर रोजी कोर्ट मॅरेज करण्याचे ठरले. मात्र, तो त्या दिवशी विवाह निबंधकांकडे हजर राहिला नाही. त्यानंतर ग्रामस्थांनी मध्यस्थी करत त्याची समजूत देखील काढली. पुन्हा २ डिसेंबर रोजी कोर्ट मॅरेज ठरले. मात्र, सलग दुसऱ्यांदा तो अनुपस्थित राहिला. त्यामुळे पीडिताने वलगाव पोलीस ठाणे गाठले. आरोपीने आपल्याला लग्नाचे खोटे आमिष देऊन फसविल्याची तक्रार तिने नोंदविली.
सन २०१५ पासूनचे ते प्रकरण आहे. पीडिताच्या तक्रारीवरून संबंधिताविरूद्ध गुन्हे दाखल केले. टीमदेखील पाठविण्यात आली. मात्र, आरोपी फरार झाला.
– विजयकुमार वाकसे, ठाणेदार, वलगाव