हॅरिस दुर्गा, तर ट्रम्प महिषासूर !
वॉशिंग्टन/दि.२१ – अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला दोन आठवड्यांचा कालावधी उरला असून प्रचार शिगेला पोहचला आहे. प्रचारादरम्यान आरोप-प्रत्यारोप सुरू असताना एका फोटोमुळे नवीन वाद निर्माण झाला आहे. अमेरिकेत व्हायरल होणाèया फोटोत डेमोक्रॅटीक पक्षाच्या उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवार कमला हॅरिस या दुर्गा अवतारात दाखवण्यात आल्या आहेत. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना महिषासुराच्या रुपात दाखवण्यात आले आहे. कमला हॅरिस यांची पुतणी मीना हॅरिसने हा फोटो ट्विट केला. हिंदू अमेरिकन फाउंडेशनचे के. सुहाग ए शुक्ला यांनी ट्विट करून या फोटोबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. मीना हॅरिस यांनी ट्विट केलेल्या फोटोमुळे जगभरातील हिंदू समुदायातील अनेकजण व्यथित असल्याचे त्यांनी सांगितले. हिंदू अमेरिकन समुदायाच्या या संघटनेने धर्माबाबतचे फोटो व्यावसायिक वापरासंबंधीचे निर्देश जारी केले आहेत. हिंदू अमेरिकन पॉलिटिकल अॅक्शन कमिटीचे ऋषी भुतडा यांनी सांगितले, की तो अपमानजनक फोटो मीना हॅरिस यांनी तयार केला नाही. त्यांनी तो फोटो ट्विट करण्यापूर्वीच व्हाट्सअॅपवर फोटो व्हायरल झाला होता. हा फोटो बायडन यांच्या प्रचार कमिटीने तयार केला नसल्याचा खुलासा बायडन यांच्या प्रचार मोहीम टीमने केला आहे. अमेरिकन हिंदूज अगेंस्ट डिफेमेशनचे अजय शाह यांनी सांगितले, की तो फोटो आक्षेपार्ह होता. त्यामुळेच हिंदू धर्मियांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. ट्विट केलेल्या फोटोवरून टीका वाढू लागल्यानंतर हॅरिस यांनी वादग्रस्त फोटो ट्विटरवरून डिलीट केला. या फोटोत हॅरिस, बायडन आणि ट्रम्प यांचे चेहरे वापरण्यात आले आहेत. हॅरिस या दुर्गा अवतारात दाखवण्यात आल्या आहेत. तर बायडन qसहाच्या रुपात असून ट्रम्प महिषासुराच्या रुपात आहेत. कमला हॅरिस या भारतीय-आफ्रिकन वंशाच्या आहेत. भारतीय आणि आफ्रिकन वंशाच्या अमेरिकन नागरिकांची मते निर्णायक ठरणार आहेत. या मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी जो बायडन यांनी हॅरिस यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार जाहीर केले आहे.