मराठी

वादग्रस्त वक्तव्याबद्दल कमलनाथांना फटकारले

राहुल गांधी यांच्या नाराजीनंतर कमलनाथांची माफी

वायनाड/दि.२० –  काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांना मंगळवारी चांगलेच फटकारले. कमलनाथ यांनी भाजपच्या उमेदवार आणि माजी मंत्री इमरती देवी यांच्याबद्दल ‘आयटम’ शब्द वापरल्यामुळे देशभर वाद निर्माण झाला होता. त्यावरून राहुल यांनी त्यांना समज दिली. राहुल हे सध्या आपला मतदारसंघ असलेल्या वायनाडच्या दौऱ्यावर आहे. आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यात विचारलेल्या एका प्रश्नावर कमलनाथ यांच्याबद्दल राहुल यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
राहुल गांधी म्हणाले, की कमलनाथ हे काँग्रेस पक्षाचे आहेत; मात्र अशा प्रकारची भाषा योग्य नाही. कुठल्याही नेत्याला अशी भाषा वापरणे हे चांगले नाही. मला अशी भाषा वापरणे हे मुळीच आवडलेले नाही. असे वक्तव्य हे दुर्दैवी आहे असेही ते म्हणाले. मध्य प्रदेशमध्ये सध्या पोटनिवडणुकीसाठी प्रचार सुरू आहे. एका प्रचारसभेत बोलताना कमलनाथ यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. कमलनाथ यांनी इमरती देवी यांचा ‘आयटम’ असा उल्लेख केला होता. त्यावरून राजकारण तापले असून या वक्तव्याचा निषेध केला जात आहे. इमरती देवी यांनी कमलनाथ यांच्यावर हल्लाबोल केला आहे. कमलनाथ हे तर कलंकनाथ आहेत. मी त्यांना राक्षस समजते, अशी टीका त्यांनी केली. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मौन आंदोलन करत याचा निषेध केला आहे. इमरती देवी म्हणाल्या, की कधी काळी कमलनाथ यांना मी मोठा भाऊ मानत होती; मात्र मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी माझा अपमान केला. ते मुख्यमंत्री असताना आम्ही भेटायला गेल्यानंतर ते सगळ्यांना फटकारत असत. त्यांनी मुख्यमंत्रिपदाच्या कारकीर्दीत काहीही विकास केला नाही. मुख्यमंत्रिपद गेल्याने कमलनाथ यांना वेड लागले असून ते राज्यभर फिरत आहेत, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली.
एका सभेदरम्यान कमलनाथ यांनी त्या वक्तव्यावरुन स्पष्टीकरण दिले.  ते म्हणाले, की मी कोणाचा अपमान केला नाही. ते पुढे म्हणाले, की मी नाव विसरलो होतो; मात्र शिवराजसिंह चौहान निमित्त शोधत आहे. कमलनाथ कधी कोणाचा अपमान करीत नाही. अगोदर आपल्या वक्तव्याचे समर्थन करणा-या कमलनाथ यांना राहुल यांनी फटकारल्यानंतर माफी मागावी लागली.

Back to top button