अमरावती, दि. 5 : कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा वापर होत असून त्यामुळे रुग्णांना त्याचा फायदा होत आहे. त्यामुळे पूर्णपणे बरे झालेल्या रूग्णांनी प्लाझ्मादानासाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे.
गंभीर रुग्णांना बरे करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा उपयोग होत आहे. याअनुषंगाने अमरावतीत प्लाझ्मा थेरपी यंत्रणाही कार्यान्वित झाली आहे. आज कोरोनावर प्रभावी औषध आणि उपचार नाहीत. लक्षणानुसार काही विशेष औषधे दिली जात आहेत. लसीमुळे एन्टीबॉडी तयार केल्या जातात पण प्लाझ्मा थेरपीच्या माध्यमातून तयार एन्टीबॉडी रुग्णाला दिल्यास त्याच्या प्रकृतीत गतीने सुधारणा होते. त्यामुळे ज्याप्रमाणे रक्ताचा तुटवडा झाल्यावर आवाहन केले जाते, तसे आवाहन प्लाझ्मादानासाठीही जिल्हा प्रशासनाकडून केले जात आहे.
प्लाझ्मा बँक तयार करून प्लाझ्मा शास्त्रीय पद्धतीने उपलब्ध करून देणे यासाठी आरोग्य यंत्रणेकडून प्रयत्न होत आहेत. जे रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, ते प्लाझ्मा दान करून रूग्णाचा जीव वाचवू शकतात. डॉक्टर्स आपल्या रक्तातून प्लाझ्मा स्वतंत्ररीत्या काढू शकतात. त्यात अँटीबॉडी असतात जी एखाद्या रोग्याला दिली जातात. त्यामुळे त्याची प्रतिरोधक शक्ती अधिक प्रभावीपणे काम करू शकते. प्लाझ्मा थेरपी रुग्णांसाठी फायदेशीर ठरत आहे. त्यामुळे बरे झालेल्या नागरिकांनी प्लाझ्मादानासाठी पुढे येण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी केले आहे.
प्लाझ्मा थेरपीमध्ये कोरोनातून पूर्णपणे ठिक झालेल्या व्यक्तीच्या शरीरातील रक्त घेतले जाते. रक्ताचा वापर करून अँटीबॉडीजयुक्त प्लाझ्मा वेगळे केले जातात. यानंतर प्लाझ्मा कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाच्या शरीरात इंजेक्ट केला जातो.
जेव्हा शरीर कोणत्याही बॅक्टेरीयाच्या संपर्कात येते तेव्हा रोगप्रतिकारक यंत्रणा स्वयंचलितपणे सक्रिय होते आणि अँटीबॉडीज रिलीज होतात. कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बरे झालेल्या रूग्णांमध्ये प्लाझ्मामध्ये अँटीबॉडीज असतात जे आधी कोरोनाशी लढलेले असतात.
हा प्लाझ्मा कोणत्या रुग्णाला द्यायचा हे डॉक्टर्स ठरवितात. मध्यम व तीव्र स्वरुपाची लक्षणे असलेल्या व नेहमीच्या औषध उपचारांनी बरा न होणारा, ऑक्सिजनची गरज असणारा रुग्ण निवडला जातो.
एखादा पूर्णपणे बरा झालेला रुग्ण www.plasmayoddha.in याठिकाणी आपली नोंद करून प्लाझ्मा देण्याची इच्छा व्यक्त करून एखाद्या रुग्णाचा जीव वाचवू शकतो.