मुसळधार पावसाने जनजीवन ठप्प
प्रतिनिधि/दी.4
मुंबईः पावसाने सोमवारी रात्रीपासून मुंबई आणि उपनगराला अक्षरश: झोडपले. मंगळवारी ठिकठिकाणी पाणी गुडघाभर पाणी साचल्याने वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि उपनगरांमधील सर्व शासकीय कार्यालयांना मंगळवारी सुट्टी जाहीर करण्यात आली. हवामान विभागाने अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला असून खबरदारी म्हणून शासकीय कार्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. अत्यावश्यक सेवा देणा-या यंत्रणा मात्र सुरू होत्या.
मंगळवार आणि बुधवारी मुंबई आणि उपनगरात हवामान विभागाने रेड अलर्ट जाहीर केला आहे. येत्या २४ तासात मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरमध्ये अतिवृष्टीचा तर दक्षिण कोकणात पुढील ३६ तासात जोरदार पावासाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. याशिवाय मध्य महाराष्ट्रातही जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईत पडलेल्या मुसळधार पावसाने मुंबई शहरात अनेक सखल भागात पाणी साचलेले पाहायला मिळाले. मुंबईसह उपनगरात दोन दिवस अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने समुद्र किनारे आणि किना-याजवळ नागरिकांनी जाणे टाळावे. तसेच एखाद्या ठिकाणी पाणी साचल्यास त्या ठिकाणीही जाणे टाळावे, अशा सूचना मुंबई पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाद्वारे नागरिकांना करण्यात आले आहे. ठाणे, रायगड आणि पालघरमधील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागांत हायअलर्ट देण्यात आला आहे.
मुंबईला सोमवारी रात्रीपासून कोसळणा-या पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. शहरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले असून मुंबईकरांचे जनजीवन ठप्प झाले आहे, तर मालाड पूर्वेकडील भागात पश्चिम द्रुतगती मार्गावर दरड कोसळल्याने वाहतूक कोलमडली. मुसळधार पावसामुळे मालाडमध्ये पश्चिम द्रुतगती मार्गावर डोंगराचा काही भाग कोसळला. एका कार समोरच हा भाग कोसळला असून विजेचा खांबही कोसळला आहे. त्यामुळे संपूर्ण मातीचा ढिगारा रस्त्यावर आल्याने मीरारोडहून मुंबईला येणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली.
मुंबई पावसामुळे हिंदमाता, अंधेरी, कुर्ला, सायन यासह अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याचे पाहायला मिळाले. रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्यांवरील वाहतुकीवर परिणाम झाला. पावसामुळे आणि ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. तसेच, काही ठिकाणी पाणी साचल्याने बेस्ट बसेसचे मार्ग वळवळण्यात आलेत. यामध्ये सायन रोड नंबर २४, गांधी मार्केट, किंग्ज सर्कल, हिंदमाता यांचा समावेश आहे. पावसाचा लोकलवरही परिणाम झाला आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकलची वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. हार्बर रेल्वे मार्गावरील कुर्ला ते सीएसएमटी दरम्यान वाहतूक बंद तर मध्य रेल्वे मार्गावरील वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. पावसामुळे दादर हिंदमाता, सायन, किंग्ज सर्कल, माटुंगा, अंधेरी सबवे आणि कुर्ला परिसर हे जलमय झाले आहेत. अनेक झोपडपट्टी भागातील घरातदेखील पाणी शिरले आहे. कुर्ला एलबीएस मार्गासहीत, नेहरूनगर, घाटकोपर, चेंबूर आदी ठिकाणी घरात पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे.
मुबई व्यतिरिक्त महाराष्ट्रात ठाणे, पुणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातही रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. येथे पुढील 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.