वरुड/दि.३० – तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून बरसलेल्या पावसाने नदीकाठावरील शेतक:यांचे नुकसान झाले असून संत्रा मोसंबीची फळझाडे वाहून गेली तर शेती खरडून निघाल्याने शेतक:यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतातील कपाशीची झाडांही सुकल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
गुरुवार दि.२७ दुपारपासून तालुक्यात पावसाला सुरुवात झाली. काल शनिवार पर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती. गेल्या ३६ तासात १२० मिमी पावसाची नोंद करण्यात आली. या पावसाने नदीनाल्यांच्या काठावरील शेतीला तसेच पाणी साचल्याने उभ्या पिकांना अति पावसाचा फटका बसला. यामध्ये राजुरा बाजार येथील चुडामनी नदीला पूर आल्याने नदी काठावरील श्रीकांत कुबेटकर या शेतक:याचे शेत खचले तर शेतात पाणी घुसल्याने तुरीचे पीक खराब झाले.
पुराच्या पाण्याने कुबेटकर यांच्या शेतातील ५५ मोठी संत्रा झाडे तर लागवड केलेली लहान संत्रा झाडे वाहून गेली तसेच गाडेगाव येथील वैभव पाचपोहर या शेतक:याच्या शेतातून चुडामनी नदीला आलेल्या पुराचे पाणी घुसल्याने शेतातील २५ मोसंबीचे फळझाडे उन्मळून पडली. सद्य: त्यांच्या मोसंबीवर मोसंबीची फळे होती, याबरोबरच त्यांच्या शेतातील तूर पिकाचे नुकसान झाले असून शेतखरडुन निघाले आहे. यात त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच सागर होले, संध्या हरले, सुरेश दूधकवरे, प्रविण साबळे, राजाभाऊ सोनारे, राजा गोमकाळे, पुरशा हले, मंगेश काकडे, मंगेश दापुरकर, सचिन सावरकर, प्रकाश देवताळे, मालती देवले आदी शेतक:यांच्या शेतातील तूर, कपाशी तसेच फळझाडांचे नुकसान झाले. दरम्यान या दोन्ही शेतक:यांच्या नुकसानीची माहिती संबंधित तलाठ्यांना देण्यात आली. तालुक्यात झालेल्या अती पावसाने शेतात पाणी साचल्याने पिकांना धोका निर्माण झाला असून काही शेतक:यांच्या शेतातील कपाशी सुकल्याचे आज सकाळी दिसून आले. एकीकडे सोयाबीन पीक तांबेरा या रोगाने पिवळे पडल्याने शेतकरी हवालदिल झाला असतांनाच आता या अती पावसाने कपाशीचे होत असलेले नुकसान बघून शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.